रविवारची प्रचार पर्वणी; उमेदवारांची आज दारोदार धावपळ, सुट्टीच्या दिवशी मतदारांना गाठण्याचा सर्वच पक्षाच्या उमेदवारांचा प्रयत्न
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता अवघ्या आठ दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्याने आज, रविवारी मतदारांना घरोघरी आणि गल्लोगल्ली गाठण्याची सुवर्णसंधी उमेदवार साधणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला केवळ १० दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असून प्रचारासाठी केवळ आठ दिवस मिळणार आहेत. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने उमेदवारांकडून प्रचार फेऱ्या, चौकसभा आणि घरोघरी प्रचारावर भर दिला जाणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे पुढील आठ दिवस प्रचाराचा धुरळा उडणार आहे.
जाहिर सभा, चौकसभा, प्रचारफेरीचा धडाका सुरू झाला आहे. रविवार सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे बहुतांश मतदारांशी संपर्क करता येणार असल्याने सर्वच पक्षांच्या उमेदवारांकडून चौकसभा, घरोघरी गाठीभेटीवर भर देण्याचे नियोजन केले आहे. जवळपास सर्वच पक्षांच्या जाहीर प्रचारसभा होत असून त्यात आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. रविवारीच्या सुट्टीत ताई, माई आक्का म्हणत सोसायट्या, झोपडपट्ट्या चाळींमधील मतदारांच्या भेटीगाठी घेऊन उमेदवारांकडून प्रचार केला जाणार आहे. अनेक उमेदवारांकडून प्रचाराचे तसे नियोजन ठरले आहे. त्यामुळे रविवारचा सुट्टीचा दिवस प्रचाराच्या धडाक्याने गाजणार आहे.