महायुती लागली कामाला! लोकसभेची तयारी : १४ जानेवारीपासून सर्व जिल्ह्यांत मेळावे

महायुती लागली कामाला! लोकसभेची तयारी : १४ जानेवारीपासून सर्व जिल्ह्यांत मेळावे

आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी जोरात सुरू केली असून, महायुतीत हालचालींना वेग आला आहे.

राजा माने/मुंबई

आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी जोरात सुरू केली असून, महायुतीत हालचालींना वेग आला आहे. महायुतीने राज्यात मिशन ४५ वर लक्ष केंद्रीत केले आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील सर्वच जिल्ह्यांत १४ जानेवारीपासून मेळावे आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. बुधवारी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत याची माहिती देण्यात आली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात आम्ही ४५ जागा जिंकू. मोदींच्या नेतृत्वाखाली राज्यात आम्हाला नक्कीच मोठे यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या ऐक्याचा संदेश पोचविण्याच्या दृष्टीने बुधवारी मुंबईत एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांची उपस्थिती होती. यावेळी या नेत्यांनी महायुतीच्या पुढील कार्यक्रमाची माहिती दिली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही तयारी करण्यात आली असून, आता जिल्ह्या-जिल्ह्यांत मेळावे आयोजित केले जाणार आहेत. यासंदर्भात माहिती देताना बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रत्येक जिल्ह्यांत जाहीर मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. त्यात जिल्ह्यासोबत तालुका स्तरावर, बूथ स्तरीय मेळावेदेखील घेतले जाणार आहेत. सर्व घटकपक्षांना सोबत घेऊन हे मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. जनता महायुतीसोबत आहे. त्यामुळे जनतेत जाऊन आम्ही आमचे काम करू आणि जनतेचा आशीर्वाद घेतला जाणार आहे. आगामी निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मोठे यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

महायुतीतील तिन्ही पक्षांनी ही युती मजबूत करण्याचा निर्धार केला आहे. आगामी निवडणुकीत राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी ४५ प्लसपर्यंत मजल मारायची आहे. महायुतीला ५१ टक्क्यांपर्यंत मते मिळणार आहेत, त्यामुळे महायुतीला ४५ प्लसपर्यंत मुसंडी मारता येईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. आम्हाला मोदीच पंतप्रधान हवे आहेत, अशी अपेक्षा सर्व्हेतून समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे उभा असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि शिवसेनेचे दादा भुसे यांनीही आगामी मेळाव्यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.

पक्षप्रवेशासाठी अनेकजण इच्छुक

राज्यातील महायुती मजबूत झाली असून, सध्या अनेकजण महायुतीत यायला इच्छुक आहेत. त्याची प्रचिती लवकरच येईल. पक्ष प्रवेशासाठी लोकांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीकडे फक्त नेतेच शिल्लक असतील, असा टोलाही बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला.

विधानसभेतही महायुतीला यश

लोकसभा निवडणुकीत महायुती ४५ प्लस जागा जिंकणार आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतदेखील महायुतीला मोठे यश मिळणार असून, विधानसभेच्या २८८ जागांपैकी महायुती तब्बल २२५ जागांवर विजय मिळवेल, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in