‘इंडिया’ आघाडीला बाहेरून पाठिंबा देणार,ममता बॅनर्जी यांची घोषणा

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पूर्ण झाल्यानंतर एनडीए व इंडिया आघाडीत जोरदार लढत सुरू आहे. प. बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी ‘इंडिया’ आघाडी सत्तेत आल्यास त्यांना बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.
‘इंडिया’ आघाडीला बाहेरून पाठिंबा देणार,ममता बॅनर्जी यांची घोषणा

कोलकाता : लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पूर्ण झाल्यानंतर एनडीए व इंडिया आघाडीत जोरदार लढत सुरू आहे. प. बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी ‘इंडिया’ आघाडी सत्तेत आल्यास त्यांना बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.

त्या म्हणाल्या की, केंद्रात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार बनल्यास आम्ही त्यांना बाहेरून पाठिंबा देऊ. दिल्लीत सरकार बनवायला त्यांना पूर्ण मदत करू. त्यामुळे आमच्या मुली व महिलांना त्रास होणार नाही. ‘इंडिया’ आघाडीत २८ पक्ष आहेत. त्यात काँग्रेसचाही समावेश आहे. प. बंगालमध्ये भाजपच्या विरोधात तृणमूल, सीपीआय, सीपीआय (एम) हे एकत्रित लढत आहेत. मात्र त्यांच्यात जागावाटपच होऊ शकले नाही.

ममतांवर माझा विश्वास नाही - अधीररंजन चौधरी

ममता बॅनर्जी यांच्या घोषणेनंतर त्यांच्या या राजकीय गुगलीवर ‘इंडिया’ आघाडीत संभ्रम आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर माझा विश्वास नाही. त्या आघाडी सोडून पळून गेल्या होत्या. आता काँग्रेसची सत्ता येत असल्याने त्यांनी आतापासूनच फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. तसेच उद्या भाजप सरकार बनत असल्यास त्या त्यांच्यासोबतही जाऊ शकतात. माझा त्यांच्यावर विश्वास नाही, असे कॉग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांनी सांगितले.

डाव्यांसोबत ममतांचा वाद

‘इंडिया’ आघाडीत डाव्या पक्षांचा समावेश आहे. त्यावर ममता बॅनर्जी यांनी अनेकदा आक्षेप घेतला आहे. डावे पक्ष ‘इंडिया’च्या अजेंड्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे मी सहन करणार नाही, असे ममता यांनी काही दिवसांपूर्वीच ठणकावले होते.

....जो ‘सीएए’ हटा सके - मोदी

पंतप्रधानपदावरून दूर होतील तेव्हा सीएएही जाईल, असा दावा इंडिया आघाडी आजही करीत आहे. ‘देश मे कोई माई का लाल पैदा हुआ है, जो सीए हटा सके, सीएए कोणीच हटवू शकत नाही’, असे मोदी म्हणाले. विरोधकांचा खोट्या धर्मनिरपेक्षतेचा बुरखा आपण फाडला आहे, धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली त्यांनी मतांचे राजकारण केले आणि हिंदू-मुस्लिमांना एकमेकांविरुद्ध लढविले, असेही ते म्हणाले.

इंडिया आघाडी खटाखट, खटाखट फुटणार

दरम्यान, प्रतापगड येथील सभेत मोदी यांनी राहुल यांच्यावरही निशाणा साधला. सत्तेवर आल्यानंतर महिलांच्या बँक खात्यामध्ये 'खटाखट, खटाखट' पैसे पाठविले जातील, असे राहुल म्हणाले होते. निवडणुकीनंतर मोदी सरकार स्थापन होणार हे निश्चित आहे, मात्र इंडिया आघाडी 'खटाखट खटाखट' फुटणार, हे लोक 'खटाखट खटाखट' पसार होतील आणि केवळ आम्हीच राहू आणि आम्हीच अहोरात्र देशाची सेवा करू, असेही मोदी म्हणाले. नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत (सीएए) विरोधी पक्ष असत्य माहिती पसरवत असल्याचा आरोप मोदी यांनी केला. तुम्हाला जे करावयाचे आहे ते करा, तुम्ही हा कायदा रद्द करू शकणार नाही, असेही मोदी यांनी विरोधकांना सुनावले.

निर्वासितांना नागरिकत्व प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रमाणपत्रे देण्यात आलेल्या व्यक्ती हिंदू, शीख, जैन आणि बौद्ध आहेत. ते देशात अनेक वर्षांपासून निर्वासित म्हणून वास्तव्य करीत आहेत. ते धर्माच्या नावावर झालेल्या फाळणीचे पीडित आहेत, असे मोदी म्हणाले. काँग्रेसने या निर्वासितांकडे दुर्लक्ष केले, काँग्रेस आणि सपा ‘सीएए’बद्दल असत्य माहिती पसरवत आहेत. उत्तर प्रदेश आणि संपूर्ण देशात दंगली घडविण्याची त्यांची इच्छा आहे, असा आरोप त्यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in