जरांगेंची मुंबईकडे कूच; पोलिसांच्या सुट्ट्या रद्द : कार्यकर्त्यांना १४९च्या नोटिसा

२६ जानेवारी रोजी मुंबईत मी आमरण उपोषण करायचंच आहे. असे सांगत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवारी मुंबईत आंदोलन करण्यासाठी मुंबईच्या दिशेने कूच केली.
जरांगेंची मुंबईकडे कूच; पोलिसांच्या सुट्ट्या रद्द : कार्यकर्त्यांना १४९च्या नोटिसा

जालना : आम्ही आरक्षण मिळवण्यावर ठाम आहोत. सरकारशी बोलून काहीही फायदा नाही. सरकार जाणूनबुजून आरक्षण देत नसेल तर मला टोकाचं पाऊल उचलावं लागेल. २६ जानेवारी रोजी मुंबईत मी आमरण उपोषण करायचंच आहे. असे सांगत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवारी मुंबईत आंदोलन करण्यासाठी मुंबईच्या दिशेने कूच केली. दरम्यान, पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून मराठा आंदोलनातील कार्यकर्त्यांना कलम १४९ नुसार नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

जरांगे-पाटील म्हणाले, ‘‘मराठ्यांच्या ५४ लाख कुणबी नोंदी मिळाल्या आहेत. २५० पेक्षा जास्त तरुणांनी बलिदान दिले. हे सरकार तरीही आम्हाला आरक्षण देत नाही,’’ असे सांगताना जरांगे यांना अश्रू अनावर झाले. ‘‘यांच्यापेक्षा निर्दयी कोणी नाही. एक महिना झाला, आम्ही मुंबईला जाण्याची घोषणा केली. तरीही सरकारने लक्ष दिले नाही. यांनी आम्हाला बरबाद करायचं ठरवलं असेल तर यांचा राजकीय सुफडा साफ करावा लागेल, असा इशाराही मनोज जरांगे यांनी सरकारला दिला.

‘‘तुम्ही आरक्षण दिलं असतं तर मुंबईला जाण्याची वेळ आली नसती. माझ्या छातीत गोळ्या जरी घातल्या तरी माघार घेणार नाही. मी तुमच्यात असो-नसो आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेऊ नका,’’ अशी भावनिक सादही त्यांनी समाजाला घातली. आतापर्यंत काय-काय घडलं आहे हे सगळ्यांना माहीत आहे. मुंबईच्या आंदोलनात एकत्र ताकद दाखवा. एकी तशीच ठेवा. मराठा समाजाचा आता नाइलाज आहे. ७ महिने आम्ही सरकारला दिले. आता आम्ही मुंबईला जाणार, आमच्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे राहा,’’ असे मराठा समाजाला त्यांनी आवाहन केले.

आता कोणत्याही परिस्थितीत माघार नाही. हे सांगताना जरांगे-पाटील म्हणाले, ‘‘आम्ही आमचेही टप्पे पाडलेले आहेत. माझ्यासोबत किती लोक दिसतील माहीत नाही. पण, मुंबईजवळ गेल्यावर हा आकडा कोट्यवधीत असेल. ही आता शेवटची लढाई आहे, कुणीही घरी थांबू नका. आम्हाला वाटेला लावण्यासाठी या. जो उद्रेक करेल, त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या. शांतपणे चला. कुणीही व्यसन करू नका. कुणीही राग व्यक्त करू नका.’’

बच्चू कडू मोर्चात सहभागी होणार

सरकारच्या वतीने जरांगे-पाटील यांच्याशी चर्चा करायला बच्चू कडू अनेकदा गेले. आता तेच बच्चू कडू जरांगे यांच्यासोबत मुंबईकडे येणाऱ्या मोर्चात सहभागी होणार आहेत. याबाबत जरांगे म्हणाले, ‘‘नोंदी सापडूनही तुम्ही आरक्षण देत नाही. त्यामुळे आम्हाला लढावे लागत आहे. सरकारच्या दरबारात मरण आलं तर चांगलं. मराठा आंदोलकांना नोटीस देणं, केसेस करणं, हा आता सरकारचा धंदा झाला आहे. आम्हाला कुणीही आडवू शकत नाही. लोक घर सोडायला लागलेत. सरकारसोबत चर्चा सुरू राहु द्या, असे काही जणांनी आम्हाला सांगितले आहे. आ. बच्चू कडू राजकारणी किंवा नेता म्हणून नाही, आंदोलक म्हणून ते मोर्चात सहभागी होणार आहेत.’’

जरांगे यांना अश्रू अनावर

‘‘या उपोषणामुळे माझं शरीर मला साथ देत नाही. मी तुमच्यात असो-नसो आरक्षणाचा माझा विचार मरू देऊ नका. आंदोलन सुरूच ठेवा, समाजासाठी शेवटपर्यंत लढणार आहे. आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिले, त्यांची आठवण माझ्या डोळ्यासमोर आली, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं. आता बघ्याची भूमिका आम्ही घेणार नाही. सरकारला आता नीट केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा निश्चय जरांगे-पाटील यांनी व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in