उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मराठी मुस्‍लिम सेवा संघाचा पाठिंबा

आपण मराठी आहोत, एकत्र काम करू, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी या संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मराठी मुस्‍लिम सेवा संघाचा पाठिंबा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आता विविध पक्ष व संघटनांचा पाठिंबा मिळू लागला आहे. विशेष म्‍हणजे मराठी मुस्‍लिम सेवा संघानेही त्यांच्या पक्षाला पाठिंबा दिला आहे. देशभक्‍त मुस्‍लिम नेहमी शिवसेनेच्या पाठिशी उभा राहिला आहे. आपण मराठी आहोत, एकत्र काम करू, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी या संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

मुंबई, मराठवाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात सक्रीय असलेल्या मराठी मुस्लिम सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मराठी मुस्लिम सेवा संघ महाराष्ट्राची अस्मिता, एकता आणि अखंडतेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे त्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले. मराठी मुस्लिम सेवा संघाचे अध्यक्ष फरीर मोहम्मद ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली यावेळी संघाच्या वतीने उद्धव ठाकरे यांना एक पत्र देण्यात आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तत्वे आणि मूल्यांवर शिवसेना पक्षाची स्थापना केली. आज देशामध्ये जातीधर्माचे राजकारण करून द्वेष पसरवणारे याच शिवसेनेला हिंदुत्व शिकवू लागले आहेत; पण उद्धव ठाकरे खरे हिंदुत्व जपले आहे, अशा भावना यावेळी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी शिवसेना नेते अनंत गीते, खासदार अरविंद सावंत, संघाचे पदाधिकारी डॉ. ए. आर. खान, नुरुद्दीन नाईक, अख्तर शेख, इस्माईल समदुले, शब्बीर शेख, कॅप्टन अकबर खलापे आदी उपस्थित होते.

देशभक्त मुस्लिम बांधव नेहमीच शिवसेनेच्या पाठिशी राहिले आहेत. तुम्ही बंधुत्वाच्या नात्याने आलात, पाठिंबा दर्शवलात त्याबद्दल आभार. आपण मराठी आहोत. एकत्र काम करू, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in