विधानसभेसाठी मविआचे 'रणशिंग'; बंडखोरांचे परतीचे दोर कापल्याचे शरद पवार, उद्धव यांनी केले स्पष्ट

लोकसभेच्या निवडणुकीत लक्षणीय यश संपादन केल्याने बळ प्राप्त झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानसभेच्या आगामी निवडणुकीत यशाची कमान चढती ठेवण्याचा निर्धार शनिवारी व्यक्त केला.
विधानसभेसाठी मविआचे 'रणशिंग'; बंडखोरांचे परतीचे दोर कापल्याचे शरद पवार, उद्धव यांनी केले स्पष्ट
Published on

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीत लक्षणीय यश संपादन केल्याने बळ प्राप्त झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानसभेच्या आगामी निवडणुकीत यशाची कमान चढती ठेवण्याचा निर्धार शनिवारी व्यक्त केला. ही सुरुवात आहे, अखेर नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख (उबाठा) उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करून विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढणार असल्याचे स्पष्ट केले आणि महायुतीच्या वळचणीला जाण्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते शरद पवार यांनीही बंडखोरांचे परतीचे दोर कापून टाकल्याचे स्पष्ट करीत उद्धव यांना अधिक आश्वस्त केले. त्याचप्रमाणे काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ताबदल अटळ असल्याचे मत व्यक्त करीत महाविकास आघाडी एकसंध असल्याचे स्पष्ट संकेत दिले.

लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातील ४८ जागांपैकी ३० जागांवर विजय संपादन केल्यानंतर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रथमच संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेनंतर शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेसच्या नेत्यांनी ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत प्राथमिक चर्चा केली.

भाजपची अजिंक्यता म्हणजे किती पोकळ कल्पनाविलास होता हे राज्यातील जनतेने दाखवून दिले. महाविकास आघाडीचे यश हा अंत नसून सुरुवात आहे. निवडणुकीच्या प्रचारात आपण श्रोत्यांना देशभक्त असे संबोधले आणि ते देशभक्तच लोकशाही वाचविण्यासाठी सरसावले. आता संघर्ष सुरू झाला आहे. मोदी सरकार हे आता एनडीए सरकार झाले असून ते किती काळ टिकते ते पाहणेच उरले आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

महाविकास आघाडी ही अनैसर्गिक आघाडी असल्याची खिल्ली भाजपकडून उडविण्यात येत होती. आता केंद्रातील सरकारला नैसर्गिक की अनैसर्गिक म्हणावयाचे, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. विरोधकांनी निवडणुकीच्या प्रचारामध्ये अपप्रचार केला याबाबत विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले की, इंडिया आघाडी तुमची संपत्ती हिरावून ती अनेक अपत्ये असलेल्यांना देणार, मंगळसूत्र काढून घेणार, अशी वक्तव्ये करण्यात आली, त्याला काय म्हणणार, असा सवालही ठाकरे यांनी केला.

परतीचे दोर कापले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील काही नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्या गटातील नेते शिवसेनेत (उबाठा) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसमध्ये परतणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी त्यांचे परतीचे दोर कापले असल्याचे स्पष्ट केले. तेलुगु देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू आणि जेडीयूचे नितीशकुमार यांच्याशी आघाडीची सुतराम शक्यता नाही, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले होते, त्याकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले.

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण, असे विचारले असता उद्धव म्हणाले की, प्रथम सत्तारूढ महायुतीला त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करू द्या.

यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. महाविकास आघाडीसाठी राजकीय वातावरण पोषक केल्याबद्दल आम्ही मोदी यांचे आभार मानतो, असे शरद पवार म्हणाले. राज्यात मोदी जेथे रोड शोला हजर होते जेथे त्यांनी सभा घेतल्या, तेथे भाजप अथवा त्यांच्या घटक पक्षांचे उमेदवार पराभूत झाले, असेही ते म्हणाले. अजित पवार यांना महायुतीमध्ये सहभागी करून घेण्यात कसला शहाणपणा होता, असा प्रश्न रा. स्व. संघाच्या काही नेत्यांनी उपस्थित केला होता त्याबद्दल विचारले असता शरद पवार म्हणाले की, त्यांना आलेल्या अनुभवानुसार त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

सत्ताबदल अटळ

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आघाडीमध्ये मोठा भाऊ, लहान भाऊ असा प्रकार नाही. आम्ही विधानसभेची प्रत्येक जागा जिंकण्याचा प्रयत्न करू आणि आघाडीला विजय मिळवून देतील असे उमेदवार रिंगणात उतरवू. आम्ही लवकरच तयारीला लागणार आहोत. राज्यात सत्ताबदल अटळ आहे, असेही ते म्हणाले.

प्रभूरामचंद्र भाजपमुक्त

शिवसेनेला (उबठा) मुस्लिम मते मिळाली, मराठी भाषकांची मते मिळाली नाहीत, असे भाजपचे काही नेते म्हणत आहेत त्याबद्दल विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले की, देशभक्तांनी धार्मिक सीमा ओलांडून विरोधकांना मतदान केले आणि त्यामध्ये मुस्लिम आणि मराठी भाषकही होते. भाजपचा अयोध्येत पराभव झाला त्याबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणुकीच्या निकालाने प्रभूरामचंद्रांना भाजपमुक्त केले. तुम्ही भाजपप्रणित एनडीएच्या वळचणीला जाणार असल्याची चर्चा आहे त्याबद्दल विचारले असता उद्धव म्हणाले की, समजा आपण त्यांच्या वळचणीला जाणार असलो तर ते आपण शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत एकत्र बसून सांगणार का?

हा तर सत्तेचा दुरुपयोग - शरद पवार

२०१०मध्ये कथित प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बुकर पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांच्यावर नवी दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी अवैध कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत (यूएपीए) खटला भरण्यास दिलेली मंजुरी म्हणजे सत्तेचा दुरुपयोग असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी सांगितले. मविआच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रॉय यांच्यापाठोपाठ काश्मीरमधील प्राध्यापक शेख शौकत हुसेन यांच्यावरही कारवाई करण्यास सक्सेना यांनी हिरवा कंदील दिला आहे. या दोघांवर २८ ऑक्टोबर २०१० रोजी गुन्हा दाखल झाला होता.

logo
marathi.freepressjournal.in