मुंबईत आज महायुती, मविआच्या सभा; मोदी-राज एका व्यासपीठावर, बीकेसीत उद्धव, पवार, केजरीवालांची उपस्थिती

महायुतीची जाहीरसभा शुक्रवारी छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. मोदींच्या रोड शोनंतर महायुतीच्या मुंबईच्या प्रचाराचा हा एक प्रकारे ‘ग्रँड फिनाले’च असणार आहे.
Modi-Raj presence of Uddhav, Pawar, Kejriwal in BK on a platform

मुंबई : महायुतीची जाहीरसभा शुक्रवारी छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. मोदींच्या रोड शोनंतर महायुतीच्या मुंबईच्या प्रचाराचा हा एक प्रकारे ‘ग्रँड फिनाले’च असणार आहे. भाजप आणि महायुतीच्या प्रचारातील हुकमी अस्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या सभेचे प्रमुख वक्ते असणार आहेत. सोबतच पंतप्रधान मोदींना बिनशर्त पाठिंबा देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील या सभेस उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे हे प्रथमच राजकीय व्यासपीठावर एकत्र असणार आहेत. त्यामुळे या सभेत दोघे काय बोलणार? महाविकास आघाडीवर या दोन तोफा कशा धडाडणार याचे औत्सुक्य जनतेत आहे. दरम्यान, या सभेच्या माध्यमातून महायुती जोरदार शक्तिप्रदर्शनही करणार आहे.

मुंबईच्या सहा जागांसाठी सोमवारी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महायुतीची जाहीरसभा शिवाजी पार्क येथे होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले या सभेस उपस्थित असतील. संध्याकाळी पाच वाजता ही सभा सुरू होणार आहे.

महासभेच्या माध्यमातून मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा महायुतीचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी शहरभरात जोरदार जाहिरातबाजी करण्यात आली आहे. शिवाजी पार्कपासून सगळीकडे मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी जमविण्याचाही प्रयत्न महायुतीकडून करण्यात येणार आहे. मनसे देखील आता सोबत असल्याने सभेला गर्दी होईल, असा अंदाज आहे.

बीकेसीत उद्धव, पवार, केजरीवालांची उपस्थिती

मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) मैदानावर शुक्रवारी महाविकास आघाडीच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आदी नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत. पंतप्रधान मोदींनी शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी पवार गटाला ‘नकली’ असे हिणवले होते. भाजप आणि एकूणच महायुतीला या सभेतून महाविकास आघाडी भीमटोला हाणणार आहे. तुरुंगातून निवडणूक प्रचारासाठी सुटका झालेले अरविंद केजरीवाल हे या सभेचे प्रमुख आकर्षण असतील.महाराष्ट्रात सोमवारी पाचव्या आणि अंतिम टप्प्याचे मतदान होत आहे. महाविकास आघाडी या सभेच्या निमित्ताने मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे.

शुक्रवारी महायुती व महाविकास आघाडी या दोघांच्याही सभा एकाच वेळेला होणार आहेत. पंतप्रधान मोदींनी मुंबईत रोड शो करून महायुतीसाठी वातावरण निर्मिती केली असून हा प्रभाव नष्ट करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीतील नेते या सभेच्या निमित्ताने करतील, अशी शक्यता आहे. महायुती व मविआ या दोघांच्याही जाहीरसभा एकाचवेळी असल्याने कुणाच्या सभेला जास्त गर्दी होते हे पाहणे राजकीय निरीक्षकांच्या दृष्टीने व मतदारांचा कल कुणाकडे आहे हे पाहण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in