मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी आरूढ! मोदींसह ७२ मंत्र्यांचा शपथविधी; ३० कॅबिनेट, ५ स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री, ३६ राज्यमंत्री

राष्ट्रपती भवनातील भव्य प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात व देशविदेशातील मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.
मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी आरूढ! मोदींसह ७२ मंत्र्यांचा शपथविधी; ३० कॅबिनेट, ५ स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री, ३६ राज्यमंत्री
X
Published on

नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनातील भव्य प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात व देशविदेशातील मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. मोदींसह ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, जे. पी. नड्डा, शिवराजसिंह चौहान, निर्मला सीतारामन, एस. जयशंकर यांच्यासह एकूण ७२ मंत्र्यांनी पदाची शपथ घेतली. यामध्ये ३० कॅबिनेट मंत्री, ५ स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री, तर ३६ जणांना राज्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली. नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर पंतप्रधानपदाची सलग तिसऱ्यांदा शपथ घेणारे मोदी हे दुसरे नेते आहेत.

मोदी यांनी सर्वप्रथम २०१४ मध्ये, त्यानंतर २०१९ मध्ये आणि आता २०२४ मध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडल्यानंतर रविवारी रात्री उशिरा अथवा सोमवारी खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुईझ्झू, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना, श्रीलंकेचे अध्यक्ष रानील विक्रमसिंघे, नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड, मॉरिशसचे पंतप्रधान प्रवीणकुमार जगन्नाथ, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे आणि सेशल्सचे उपाध्यक्ष अहमद अफिफ हे परदेशातील नेते विशेष निमंत्रित म्हणून हजर होते. त्याचप्रमाणे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासह अनेक पक्षांचे खासदार, उद्योगपती, चित्रपट अभिनेते, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आदी जवळपास नऊ हजार जणांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला.

मोदी यांनी सर्वप्रथम २०१४ मध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतली, तेव्हा आणि २०१९ मध्ये भाजपकडे सरकार स्थापनेसाठी आवश्यक असणारे स्पष्ट बहुमत होते, मात्र यावेळी भाजपला ६३ जागांवर पराभव स्वीकारावा लागल्याने चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगु देसम पक्ष आणि नितीशकुमार यांच्या जेडीयूवर सरकार स्थापनेसाठी अवलंबून राहावे लागले. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर केलेल्या भाषणात रालोआ असा उल्लेख करून मोदी यांनी तसे सूचितही केले.

मोदींनी रविवारी सकाळी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. यानंतर ते अटलजींच्या समाधी आणि राष्ट्रीय युद्ध स्मारकावर गेले. सकाळी मोदींनी त्यांच्या निवासस्थानी संभाव्य मंत्र्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले.

कॅबिनेट मंत्री

१) राजनाथ सिंह

२) अमित शहा

३) नितीन गडकरी

४) जे. पी. नड्डा

५) शिवराजसिंह चौहान

६) निर्मला सीतारामन

७) एच. डी. कुमारस्वामी

८) मनोहरलाल खट्टर

९) डॉ. एस. जयशंकर

१०) धर्मेंद्र प्रधान

११) जीतन राम मांझी

१२) राजीव रंजन सिंह

१३) पियूष गोयल

१४) सर्वानंद सोनोवाल

१५) डॉ. वीरेंद्र कुमार

१६) के. राममोहन नायडू

१७) वीरेंद्र खटीक

१८) ज्योतिरादित्य शिंदे

१९) अश्विनी वैष्णव

२०) गिरीराज सिंह

२१) जुएल ओराम

२२) भूपेंद्र यादव

२३) हरदीप सिंह पुरी

२४) किरेन रिजिजू

२५) गजेंद्रसिंह शेखावत

२६) अन्नपूर्णा देवी

२७) चिराग पासवान

२८) गंगापूरम किशन रेड्डी

२९) डॉ. मनसुख मांडविया

३०) सी. आर. पाटील

राज्यमंत्री

१) जयंत चौधरी (स्वतंत्र प्रभार)

२) जितिन प्रसाद

३) पंकज चौधरी

४) अनुप्रिया पटेल

५) एसपी सिंह बघेल

६) कीर्तिवर्धन सिंह

७) बी. एल. वर्मा

८) कमलेश पासवान

९) रामनाथ ठाकुर

१०) नित्यानंद राय

११) सतीश दुबे

१२) राजभूषण चौधरी

१३) नीमूबेन बमभानिया

१४) प्रतापराव जाधव (स्वतंत्र प्रभार)

१५) रामदास आठवले

१६) रक्षा खडसे

१७) मुरलीधर मोहोळ

१८) एल. मुरुगन

१९) दुर्गादास उइके

२०) सवित्री ठाकुर

२१) व्ही. सोमण्णा

२२) शोभा करंदलजे

२३) राव इंद्रजीत सिंह (स्वतंत्र प्रभार)

२४) कृष्णपाल गुर्जर

२५) पवित्रा मार्गेरिटा

२६) चंद्रशेखर पेम्मासानी

२७) भूपति राजू श्रीनिवास वर्मा

२८) अर्जुन राम मेघवाल

२९) भागीरथ चौधरी

३०) संजय सेठ

३१) बंडी संजय कुमार

३२) जितेंद्र सिंह (स्वतंत्र प्रभार)

३३) श्रीपाद यसो नाईक

३४) शांतनु ठाकुर

३५) सुकांता मजूमदार

३६) सुरेश गोपी

३७) जॉर्ज कुरियन

३८) अजय टम्टा

३९) रवनीत सिंह बिट्टू

सचोटी, पारदर्शकतेशी कधीही तडजोड करू नका - पंतप्रधान

तत्पूर्वी, मोदी यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी संवाद साधताना सांगितले की, सर्वसामान्य जनतेला नम्रपणा भावतो. त्यामुळे नम्रता अंगी बाणवा आणि सचोटी व पारदर्शकता याबाबत कधीही तडजोड करू नका. जनतेच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्याला तडा जाऊ देऊ नका. तुमच्यावर जी कामगिरी सोपविली जाईल ती प्रामाणिकपणे पार पाडा. सर्व खासदार मग ते कोणत्याही पक्षाचे असोत त्यांना जनतेने निवडून दिले आहे, त्यांच्याशी सन्मानाने वागा, अशा सूचनाही मोदी यांनी केल्या.

महाराष्ट्रातील ६ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

रविवारी झालेल्या शपथविधीत महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, मोदी यांचे अत्यंत विश्वासू पियूष गोयल, आरपीआयचे रामदास आठवले, भाजपच्या रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील प्रतापराव जाधव यांनी पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यामध्ये गडकरी व पियूष गोयल यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे.

यांना वगळले

मोदी सरकार ३.० मध्ये महाराष्ट्रातील माजी मंत्री नारायण राणे, भागवत कराड यांना वगळण्यात आले आहे. तसेच स्मृती इराणी, अनुराग ठाकूर, मीनाक्षी लेखी यांचाही पत्ता कट झाला आहे.

मंत्रिमंडळातील जातीय समीकरण

मोदी सरकार मंत्रिमंडळात ७२ मंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये ३० कॅबिनेट मंत्री, ५ स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि ३६ राज्यमंत्री यांचा समावेश आहे. मोदी कॅबिनेटमध्ये सर्व सामाजिक गटांचे नेतृत्व करणारे चेहरे आहेत. यात २७ ओबीसी, १० अनुसूचित जाती, ५ अनुसूचित जमाती, ५ अल्पसंख्यांक नेत्यांचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in