‘मोदी की गॅरंटी’ निष्प्रभ; इंडिया आघाडीला ‘अच्छे दिन’: भाजप स्वबळावर बहुमतापासून दूर, मात्र ‘एनडीए’ला बहुमत

लोकशाहीचा महामहोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बहुप्रतीक्षित निकाल मंगळवारी जाहीर झाला. भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआने (एनडीए) २९४ जागा जिंकून केंद्रात सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले आहे, तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीनेही २३२ जागा जिंकून रालोआला चांगलीच टक्कर देत त्यांच्या नाकीनऊ आणले.
PM Narendra Modi

नवी दिल्ली : लोकशाहीचा महामहोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बहुप्रतीक्षित निकाल मंगळवारी जाहीर झाला. भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआने (एनडीए) २९४ जागा जिंकून केंद्रात सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले आहे, तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीनेही २३२ जागा जिंकून रालोआला चांगलीच टक्कर देत त्यांच्या नाकीनऊ आणले. अन्य पक्षांना १७ जागा मिळाल्या आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपने स्वबळावर ३०३ जागा जिंकून बहुमत मिळवले होते. मात्र, यावेळी भाजपला केवळ २३९ जागा मिळाल्याने त्यांना एनडीएतील मित्रपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करावे लागणार आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या जागांपैकी जवळपास ६४ जागा भाजपने यावेळी गमावल्या आहेत. तर गेल्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ ५२ जागा मिळाल्या होत्या, त्या तुलनेत यावेळी काँग्रेसचे संख्याबळ ४७ जागांनी वाढले आहे. अपक्ष आणि इतर पक्षांचे १७ उमेदवार विजयी झाले आहेत.

उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात भाजपला धक्का

भाजपची भिस्त ज्या उत्तर प्रदेशवर होती, त्या राज्यात समाजवादी पक्षाने भाजपच्या तोंडाला चांगलाच फेस आणला, त्याचप्रमाणे मतदारसंघांच्या संख्येनुसार दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीनेही महायुतीच्या तोंडचे पाणी पळविले. भाजप स्वबळावर ३७० जागा जिंकणार आणि रालोआ ‘अब की बार, ४०० पार’ असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या सर्वच स्तरावरील नेते व्यक्त करीत होते. मात्र, ४०० पारच्या या विश्वासाचा फुगा महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, हरयाणा, राजस्थान आणि पश्चिम बंगालने फोडला.

लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान एकूण सात टप्प्यात पार पडले. अखेरच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी पार पडल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी मतदानोत्तर चाचणीचे निकाल जाहीर होऊ लागले, त्यामध्ये रालोआ घोषणेप्रमाणे ४०० पारचा आकडा गाठणार, असे निष्कर्ष जाहीर झाले. त्यानंतर भाजपसह त्यांचे मित्रपक्ष आणि समर्थक यांना आकाश ठेंगणे झाल्यासारखे झाले होते. मात्र, मंगळवारी प्रत्यक्ष निकाल जाहीर होताच रालोआ, मित्रपक्ष आणि समर्थक जमिनीवर आले.

व्यूहरचनेला वेग

रालोआला मिळालेल्या संख्याबळानुसार केंद्रात पुन्हा आपणच सरकार स्थापन करणार असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. तर इंडिया आघाडीची बुधवारी दिल्लीत बैठक होणार असून त्यानंतर जुन्या सहकाऱ्यांना साद घालावयाची की नाही याचा निर्णय होणार आहे. जुने सहकारी पुन्हा इंडिया आघाडीच्या वळचणीला आल्यास सत्तेचे सोपान कोण गाठणार याबाबत देशवासीयांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

सेन्सेक्स घसरल्याने ४५ लाख कोटी बुडाले

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा अपेक्षित निकाल न आल्यामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स ४३८९.७३ अंकांनी घसरून ७२,०७९०५ वर तर निफ्टी १३७९ अंकांनी घसरून २१,८८४.५० वर बंद झाला. एका दिवसात गुंतवणूकदारांचे आतापर्यंत कोट्यवधी ४५ लाख कोटी रुपये बुडाले आहेत.

पंतप्रधान मोदींचा शपथविधी ९ जूनला?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे. येत्या ९ जून रोजी पंतप्रधान मोदी हे पदाची शपथ घेण्याची दाट शक्यता आहे. या तयारीसाठी ५ ते ९ जून दरम्यान राष्ट्रपती भवन हे अभ्यागतांसाठी बंद केले आहे.

लोकसभा - निकाल

रालोआ आघाडी - २९४

इंडिया आघाडी - २३२

इतर- १७

logo
marathi.freepressjournal.in