मोदींनी सांगितले ४०० जागांचे ‘राज’कारण,मुस्लिम आरक्षणावर लालूंना केले लक्ष्य!

काँग्रेसने काश्मीरमध्ये पुन्हा अनुच्छेद ३७० आणू नये आणि अयोध्येतील राम मंदिरावर बाबरी लॉक लावू नये यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ने ४०० जागा जिंकावयास हव्यात, अशी आपली इच्छा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले.
मोदींनी सांगितले ४०० जागांचे ‘राज’कारण,मुस्लिम आरक्षणावर लालूंना केले लक्ष्य!
Published on

धार (मध्य प्रदेश) : काँग्रेसने काश्मीरमध्ये पुन्हा अनुच्छेद ३७० आणू नये आणि अयोध्येतील राम मंदिरावर बाबरी लॉक लावू नये यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ने ४०० जागा जिंकावयास हव्यात, अशी आपली इच्छा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले.

मध्य प्रदेशातील धार येथे एका निवडणूक जाहीरसभेत मोदी बोलत होते. विरोधकांच्या इंडिया आघाडीचे कारस्थान खोलवर गेलेले आहे. त्यांना अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीयांचे आरक्षण व्होट बँकेसाठी हवे आहे, असेही ते म्हणाले.

राज्यघटना तयार करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अल्प होती, असे काँग्रेस पक्ष आता म्हणू लागला असून त्यामुळे ते डॉ. आंबेडकर यांचे महत्त्व कमी करीत आहेत, असा आरोपही मोदी यांनी केला. काँग्रेस परिवाराला डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल तिरस्कार आहे हीच वस्तुस्थिती आहे, असेही ते म्हणाले.

मुस्लिम आरक्षणावर लालूंना केले लक्ष्य

मुस्लिमांना आरक्षणाचा लाभ मिळण्यास राजदचे नेते लालू प्रसाद यादव यांनी अनुकूलता दर्शविली, त्यावरही मोदी यांनी टीका केली. त्यांना ओबीसी, एससी, एसटी या सर्वांचे आरक्षण हिसकावून ते सर्व मुस्लिमांना द्यावयाचे आहे, असा आरोप त्यांनी केला.

मुस्लिमांना आरक्षणाचा लाभ देण्यास लालूप्रसाद अनुकूल

पाटणा : राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनी मंगळवारी मुस्लिमांना आरक्षणाचे लाभ देण्यास अनुकूलता दर्शविली. घटना मोडीत काढून आरक्षण रद्द करण्याची केंद्रातील सत्तारूढ भाजपची इच्छा असल्याचा आरोपही लालूप्रसाद यादव यांनी केला.

घटनेत आरक्षणाची तरतूद केली आहे त्याला भाजपचा विरोध आहे. त्यामुळे आरक्षण आणि घटना मोडीत काढण्याची त्यांची इच्छा आहे, असे यादव म्हणाले. सत्तेवर आल्यास काँग्रेस, राजद आणि अन्य घटक पक्ष इतर मागासवर्गीयांसाठीचे आरक्षण हिसकावून ते मुस्लिमांना देतील, असा आरोप भाजपने केला. त्याबाबत लालूप्रसाद यादव म्हणाले की, मुस्लिमांना आरक्षण मिळालेच पाहिजे, पण ते धर्मावर आधारित नसावे.

logo
marathi.freepressjournal.in