नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार, ९ जून रोजी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे मोदी हे दुसरे नेते आहेत. भाजपच्या नेतृत्वाने रालोआतील घटक पक्षांच्या नेत्यांशी मंत्रिमंडळातील सहभागाबाबत चर्चा केल्यानंतर रविवारी मोदींचा शपथविधी पार पडणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह हे तेलुगु देशम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू, जेडीयूचे नेते नीतीशकुमार, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांच्या पक्षांच्या सरकारमधील प्रतिनिधित्वाबाबत चर्चा करीत आहेत.
गृह, अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार यासारखी महत्त्वाची खाती भाजप आपल्याकडेच ठेवणार आहे तर घटक पक्षांना मंत्रिमंडळामध्ये पाच ते आठ मंत्रीपदे मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शहा आणि राजनाथसिंह यांचे मंत्रिमंडळातील स्थान पक्के असून शिवराजसिंह चौहान, बसवराज बोम्मई, मनोहरलाल खट्टर आणि सर्वानंद सोनोवाल या चार माजी मुख्यमंत्र्यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे तेलुगु देशमचे राम मोहन नायडू, ललन सिंह, संजय झा आणि रामनाथ ठकूर (जेडीयू) आणि लोकजनशक्ती (आरव्ही) पक्षाचे चिराग पासवान यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र आणि बिहारमध्ये विरोधकांनी लक्षणीय कामगिरी केली असली तरी या राज्यांनाही प्रतिनिधित्व मिळण्याची चर्चा आहे. महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात तर बिहारमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत.