मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला ना भूतो ना भविष्यती असे भगदाड पाडले. त्यानंतर शिंदे यांनी पक्षाचे चिन्ह आणि नावावर आपला अधिकार सांगत त्यावर ताबा मिळवला. या काळात त्यांनी ठाकरे गटाला एकमागोमाग एक धक्का देत नेत्यांचे पक्षप्रवेश केले. यात अनेक आजी-माजी खासदार, आमदार, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता. मुंबईतील देखील अनेक आजी-माजी नगरसेवकांनी शिवसेनीची (शिेंदे गटाची) वाट धरली.
सध्या सर्व पक्षांकडून आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची तयारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे 13 खासदार निडणून येणार नाहीत असा दावा केला होता. राऊत यांच्या दाव्याला शिंदे गटाकडून उत्तर देण्यात आले आहे. शिंदे गटाने केलेल्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी संजय राऊत यांनी केलेला दावा फेटाळून लावत आमच्या गटाचे सर्व 13 खासदार निवडून येथील असा दावा केला आहे. एवढेच नाही तर ठाकरे गटाचे उरलेले खासदार शिंदे गटात येणार असल्याचा दावा देखील कृपाल तुमाने यांनी केला आहे. तुमाने यांच्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.
तुमाने यांनी या खासदारांसोबत आमची बैठक झाल्याचा दावा केला आहे. यामुळे शिंदे गटाचे उरलेले खासदार देखील शिंदे गटात जाणार की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कृपाल तुमाने यांनी माध्यमांशी बोलताना हा दावा केला आहे. काल आमची ठाकरे गटाच्या खासदारांसोबत बैठक झाली. या बैठतील ते खासदार शिंदे गटात यायला तयार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. लवकरच त्यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश केला जाणार असल्याचेही तुमाने यांनी म्हटले आहे.
आमदारांबाबत केला मोठा गौप्यस्फोट
ठाकरे गटाच्या आमदारांबाबत बोलताना तुमाने यांनी आमदारांबाबत देखील गोप्यस्फोट केला आहे. खासदारांसोबत आमदार देखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे ते म्हणाले आहेत. काल शिवसेनेची बैठक झाल्यानंतर तुमाने यांनी हा गौप्यस्फोट केला. या बैठकीत निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सुचना देण्यात आल्या असून ज्या मतादार संघातून आम्ही निवडून आलो, त्याच मतदार संघातून आम्ही निवडणूक लढवणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले. इतर मतदार संघाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिेदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. राऊत यांनी पक्षाचा सत्यानाश केला, ते इतर पक्षांचे दलाल आहेत. तरीही उद्धवजी काही बोलत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
खरं बैठक झाली की...
शिंदे गटाचे खासदार यांनी ठाकरे गटाच्या खासदारांसोबत बैठक झाली असून लवकरच त्यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश होणार असल्याचा दावा केला. त्यामुळे हे खासदार नेमके कोण होते? मुंबईतील होते की बाहेरचे? याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. तसेच खरंच बैठक झाली की शिंदे गटाने सोडलेली ही पुडी आहे? असे देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.