
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र-कर्नाटक वादावरून शिंदे सरकारवर सडकून टीका केली. पुन्हा एकदा त्यांने शिंदे सरकार पडेल असा दावा केला आहे. त्यांनी म्हंटले की, "भाजप नेते रावसाहेब दानवे यांनीच आता येत्या दोन महिन्यांत राज्यात मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले आहेत. माझ्या मनात तर हे शिंदे सरकार लवकरच पडणार, याबद्दल तिळमात्र शंका नाही. तसेच, याबाबतची काही महत्त्वाची माहितीही माझ्याकडे आहे." असा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी 'राज्यात सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. कधी काय होईल याचा नेम नाही.' असे विधान केले होते. त्यावर संजय राऊत यांनी टोला लगावला.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने समिती गठीत केली आहे. तसेच, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील भेटणार आहेत. यावर बोलताना संजय राऊत यांनी, सीमाप्रश्नासंदर्भात पंतप्रधान यांच्याशी काय चर्चा करणार हे जनतेसमोर उघड करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या चर्चेचा व्हिडियो समोर आणावा, अशी मागणी केली आहे. "महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न मुख्यमंत्र्यांनी गंभीरतेने घ्यावा. सध्याच्या सरकारमधील किती मंत्री बेळगावला गेले? शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना हे सरकार वाचवत आहे. तर मग ते सीमावासीयांना काय न्याय देणार?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.