नवी दिल्ली : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी आरुढ झाल्यानंतर आता भाजपच्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जे.पी. नड्डा यांचा भाजप अध्यक्षपदाचा कार्यकाळ जानेवारी २०२३ मध्ये संपत होता, मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा कार्यकाळ जून २०२४ पर्यंत वाढवण्यात आला होता. निवडणुकीनंतर नड्डा यांना नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे आता भाजपच्या अध्यक्षपदासाठी अनेक नावे चर्चेत आली असून त्यामध्ये विनोद तावडे, ओम माथुर, अनुराग ठाकूर, स्मृती इराणी यांच्या नावाचा समावेश आहे.
भाजपच्या ‘एक व्यक्ती, एक पद’ या धोरणाअंतर्गत पक्षाला लवकरच नवा अध्यक्ष शोधावा लागणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यामुळे आता भाजपच्या अध्यक्षपदाच्या निवडीत संघाची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे मानले जात आहे. प्रारंभी, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि हरयाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत होती. पण, या तिघांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने ती शक्यता दुरावली आहे. त्यामुळे आता भाजप अध्यक्षपदाच्या शर्यतीत पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे, बी.एल. संतोष, अनुराग ठाकूर, के. लक्ष्मण, ओम माथुर, सुनील बन्सल, स्मृती इराणी यांची नावे अग्रस्थानी आहेत.
नड्डा यांच्यानंतर भाजप अध्यक्षपदाच्या शर्यतीत भाजप ओबीसी मोर्चाचे प्रमुख के लक्ष्मण यांचे नावही चर्चेत आहे. सुनील बन्सल यांच्या नावाचाही यामध्ये समावेश आहे. अमित शहा यांचे खास असलेले बन्सल हे पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि ओडिशा या तीन राज्यांचे प्रभारीही आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ओडिशात नवीन पटनायक सरकारचा पराभव केला ही त्यांची जमेची बाजू मानली जाते.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बीएल संतोष हे देखील संघाचे प्रचारक राहिले आहेत. बी.एल. संतोष हे पडद्यामागून रणनीती बनवण्यात माहीर मानले जातात. त्यांचेही नाव अध्यक्षपदासाठी चर्चिले जात आहे. पंतप्रधान मोदींचे निकटचे मानले जाणारे ओम माथुर हे संघाचे सक्रिय प्रचारक असून, ते पंतप्रधान मोदींचे गृहराज्य गुजरातचे प्रभारीही आहेत. त्यांचे नावही चर्चेत आहे. हिमाचल प्रदेशातील हमीरपूरमधून पाच वेळा खासदार राहिलेल्या अनुराग ठाकूर यांना यावेळी मोदी मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनविण्यात येणार असल्याची चर्चा आहे. स्मृती इराणी यांचे नावही चर्चेत असून भाजपच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनण्याचा मान त्यांना मिळू शकतो.
महाराष्ट्रात जम बसवण्याचा प्रयत्न
फडणवीस सरकारमध्ये मंत्री राहिलेले विनोद तावडे हे बी.एल. संतोष यांच्यानंतरचे सर्वात प्रभावी सरचिटणीस मानले जातात. त्यांना दोन दशकांचा संघटनात्मक अनुभव असून, त्यांचा लहानपणापासून संघाशी संबंध आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकारणाला सुरुवात करणाऱ्या तावडे यांच्या नावाला संघाची मान्यता मिळू शकते. यावर्षी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता विनोद तावडेंना अध्यक्षपदी नेमून संघाचे मुख्यालय असलेल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा जम बसवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा राजकीय तज्ज्ञांचा होरा आहे.