
Andhra Pradesh CM: आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर, तेलुगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी प्रोफेशनल नेटवर्किंगसाठीचे प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लिंक्डइनवरील प्रोफाइल अपडेट केले. त्यांनी हे प्रोफाइल अपडेट करून स्वतःच्या प्रोफेशनल कामाबद्दलचं अपडेट दिलं आहे. 'मुख्यमंत्री, आंध्र प्रदेश' असा बदल त्यांनी आपल्या बायोमध्ये जोडला. त्यासोबत, "आंध्र प्रदेशच्या जनतेचा मुख्यमंत्री म्हणून कर्तव्य पुन्हा सुरू करतोय", असे नायडू यांनी लिहिले आहे.
“आंध्र प्रदेशच्या जनतेचा मुख्यमंत्री म्हणून मी माझे कर्तव्य पुन्हा सुरू करतोय, हे सांगायला आनंद होत आहे. तुम्हा सर्वांना माहीत आहे की, आपल्या राज्यातील जनतेने टीडीपी-जेएसपी-भाजपला विधानसभेच्या १६४ जागांसह सेवा करण्यासाठी जबरदस्त जनादेश दिला आहे. आमच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी, पदाधिकारी आणि नेत्यांनी केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे, ज्यांनी आमचे भविष्यासाठीचे व्हिजन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रात्रंदिवस काम केले. त्यांच्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये मोठ्या टीमचा उदय होण्याचा मार्ग मोकळा झाला, राज्यभरातील जनतेनीही त्यांच्या मतांसह आमचा चौथा सहयोगी भागीदार म्हणून एकजुटीने भूमिका घेतली." असे नायडू यांनी लिहिले. आपले नवे सरकार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन करून, "आमचे सरकार हे लोकांचे सरकार असेल. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि आमच्या पूर्ण क्षमतेनुसार लोककेंद्रित प्रशासन देऊ" असेही त्यांनी म्हटले.
मुख्यमंत्र्यांच्या या लिंक्डइन पोस्टला अपेक्षेप्रमाणे चांगला प्रतिसाद मिळाला असून अनेक नेटकरी त्यांचे अभिनंदन करीत आहेत.
तेलुगु देसम पक्षाचे सुप्रीमो नारा चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी, १२ जून रोजी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा शपथ घेतली. आंध्रचे राज्यपाल एस अब्दुल नजीर, तेलंगणाचे माजी राज्यपाल तमिलिसाई सौंदराजन या शपथविधीला उपस्थित होते. चंद्राबाबू नायडू यांच्यासह जनसेना प्रमुख पवन कल्याण, नायडूंचे पुत्र आणि टीडीपीचे सरचिटणीस मुलगा नारा लोकेश आणि इतर २२ जणांनीही शपथ घेतली. पवन कल्याण यांना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे. जनसेनेला तीन आणि भारतीय जनता पक्षाला एक मंत्रिमंडळ देऊ केले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि इतर अनेक नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नायडू मंचावर उपस्थित पंतप्रधान मोदींकडे वळले. मोदींनी आधी पुष्पगुच्छ देऊन नायडूंचे अभिनंदन केले. त्यानंतर दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली.