नारायण राणेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, 'या' मतदारसंघातून लोकसभा लढविण्याची जोरदार चर्चा

या सर्व फॅक्टरचा विचार करता, नारायण राणे यांना जर उभे राहायचे असेल तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेची साथ घेणे आवश्यक ठरणार आहे.
नारायण राणेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, 'या' मतदारसंघातून लोकसभा लढविण्याची जोरदार चर्चा

प्रतिनिधी/मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेली ही भेट पूर्णपणे वैयक्तिक स्वरूपाची होती, असे सांगण्यात येत आहे. तसेच दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याने या भेटीबाबत विविध तर्क लावण्यात येत आहेत. नारायण राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तसे असल्यास त्यांना महायुतीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची मदत लागणार आहे. त्यासाठीच ही भेट असल्याचे मानण्यात येत आहे.

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यामागे निश्चितच राजकीय कंगोरे आहेत. कारण नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत नारायण राणेंना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आलेली नाही. रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवावी, असे त्यांना पक्षातील वरिष्ठांकडून सांगण्यात आल्याचे समजते. तसे झाल्यास नारायण राणेंना महायुतीतील सर्वच पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. कारण आतापर्यंत या मतदारसंघातून उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत इच्छुक आहेत, अशीच चर्चा होती. किरण सामंत यांनी तसे स्पष्ट संकेतही दिले होते. किरण सामंत उभे राहिल्यास अर्थातच ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून उभे राहतील. किरण सामंत यांना उमेदवारी नाकारत जर नारायण राणे उभे राहिले तर त्याचा परिणाम मतदानावर होईल का, याचीही शंका आहे. कारण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पट्ट्यात सामंत बंधूंची ताकद आहे. उदय सामंत तर मंत्री आहेतच पण किरण सामंतदेखील सक्रिय असतात. उदय सामंत यांच्या विजयात किरण सामंत यांचे मोठे योगदान असते. किरण सामंत यांचा स्वत:चाही चांगला जनसंपर्क आहे.

या सर्व फॅक्टरचा विचार करता, नारायण राणे यांना जर उभे राहायचे असेल तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेची साथ घेणे आवश्यक ठरणार आहे. कारण शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतरही कोकणातील सामान्य शिवसैनिक हा मोठ्या प्रमाणावर उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे. विद्यमान खासदार विनायक राऊत यांचा जनसंपर्कही चांगला आहे. त्यामुळे जर नारायण राणे उभे राहणार असतील तर ही निवडणूक रंगतदार ठरणार, हे निश्चित आहे. कारण नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. निवडणुकीच्या रूपाने या संघर्षाला पुन्हा एकदा धार चढेल.

logo
marathi.freepressjournal.in