राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तसेच माजी मंत्री नवाब मलिक यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. या प्रकरणी मलिक यांनी जामीन मिळवण्यासाठी सुप्रिम कोर्टात धाव घेतली होती. मात्र, याबाबत आधी बॉम्बे हायकोर्टात निर्णय घेतला जाणार असून ते न्यायालय काय निर्णय घेते त्याची वाट पाहा, असे सुप्रिम कोर्टाने म्हटले आहे. नवाब मलिक यांनी प्रकृती ठिक नसल्याचे कारण देत जामीन मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्यांना कोणाताही दिलासा मिळाला नाही.
सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करताना मलिक यांनी प्रकृती ठिक नसल्याचे कारण दिले होते. ते न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हणाले होते की, "माझी एक किडनी खराब असून दुसरी किडनी देखील कमी प्रमाणात काम करते. न्यायालय एका तपासाची संमती घेण्यासाठी 2-3 आठवड्यांचा कालावधी घेते. त्यामुळे मला जामीन देण्यात यावा." असे त्यांनी याचिकेत नमुद केले होते. मात्र, न्यायमुर्ती संजीव खन्ना आणि न्यायमुर्ती एमएम सुंदरेश यांच्या पीठाने मलिक यांना कोणताही दिलासा दिला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर मलिक यांची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी मात्र नाराजी व्यक्त केली.