नवनिर्वाचित खासदार अनिल बोंडे यांची राऊतांवर टीका

राज्यसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर बोंडे आपल्या घरी अमरावतीला जात असताना त्यांनी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला
नवनिर्वाचित खासदार अनिल बोंडे यांची राऊतांवर टीका

महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडी सरकारला वैतागली आहे. त्यांचे आमदारदेखील सरकारमध्ये नाराज आहेत. सत्ता ही लोकांसाठी असते; मात्र संजय राऊतांना सत्तेचा माज आला आहे,” अशी टीका नवनिर्वाचित खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे. राज्यसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर बोंडे आपल्या घरी अमरावतीला जात असताना त्यांनी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले की, “महाविकास आघाडीच्या आमदारांना मंत्री भेटत नाहीत, मुख्यमंत्री भेटत नाहीत, तर मग जनतेला केव्हा भेटणार? त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, महिला सर्व महाराष्ट्राची जनता या सरकारला वैतागली आहे. आता जनतेला देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीकाळाची आठवण येत आहे. राज्यसभेमध्ये जे झाले ते विधान परिषदेतही होणार आहे. संजय राऊतांनी अपक्ष आमदारांचादेखील अपमान केले आहे. अपक्ष आमदार घोडेबाजारमध्ये खपले, त्यांनी पैसे घेतले, असे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा गाढवपणा दुसरा कोणी करणार नाही, ते शिवसेना करत आहे,” असे बोंडे म्हणाले.

“भारतीय जनता पक्षात प्रत्येकाला न्याय दिला जातो. संजय राऊतांनी स्वत:च्या पक्षाचे पाहावे. शिवबंधन बांधण्यासाठी संभाजीराजेंचा अपमान शिवसेनेनेच केला आहे. संभाजीराजेंना नाकारल्यानंतर एका मावळ्याला आम्ही खासदार बनवतो, असे म्हणणारी ही शिवसेना आहे. त्या मावळ्याला पराभूत करून पुन्हा सामान्य माणसाचा अपमान करणारी ही शिवसेना आहे. पंकजा मुंडे आमच्या नेत्या आहेत. त्यांना योग्य सन्मान मिळतो. त्यांची काळजी संजय राऊतांना घेण्याची गरज नाही,” असा टोलाही बोंडेंनी लगावला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in