
भाजपनेते निलेश राणे यांनी काल राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज मंत्री रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान चव्हाण आणि राणे यांच्यात तब्बल ३ तास चर्चा पार पडली. त्यानंतर हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सगर बंगल्यावर गेले. सगर बंगल्यावर नितेश राणे, रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस तब्बल दीड तास चर्चा झाली. यावेळी या नेत्यांनी निलेश राणे यांच्या नाराजीचं कारण जाणून घेतलं. यानंतर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणे हे यापुढे देखील राजकारणात राहणार असल्याचं माध्यमांसमोर जाहिर केलं.
निलेश राणे यांनी राजकारणातून बाजूला जात असल्याची घोषणा केल्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधान आलं होतं. स्थानिक पातळीवरील राजकारणात भाजप नेते हस्तक्षेप करत आहेत. तसंच दुसऱ्यांना रसद पुरवली जात आहे. त्यामुळे राणे नाराज असल्याचं देखील बोललं जात होतं. त्यानंतर आज निलेश राणे यांची मंत्री रविंद्र चव्हाण यांनी भेट घेऊन त्यांची मनधरणी केली. यानंतर निलेश राणे यांना घेऊन रवींद्र चव्हाण थेट देवेंद्र फडणवीसांच्या सगर बंगल्यावर गेले. यावेली या तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. या चर्चेत भाजपनेत्यांनी निलेश राणे यांची नाराजी दूर केली आहे.
या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, निलेश राण यांनी ट्विट केल्यानंतर नेमकं काय घडलं हे कळत नव्हतं. आम्ही याबाबत निलेश राणे यांच्यासोबत चर्चा केली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील चर्चा केली. संघटनेत काम करत असताना कार्यकत्यांवर अन्याय होऊ नये, ही सर्वांची भावना आहे. आम्ही सर्वजण सोबत काम करणार आहोत. लोकसभा विधानसभा निवडणुका लढत असताना कार्यकर्त्यांना कोणतीही अडचण येऊ नये याची खबरदारी घेतली जाणार आहे. इथून पुढे निलेश राणे राजकारणात असतील, असं रविंद्र चव्हाण म्हणाले.