
केंद्रातील भाजप सरकार हे साम, दाम, दंड आणि भेद या तत्वांचा वापर करत असल्याची टीका वारंवार विरोधकांकडून केली जाते. सर्व विरोधकांनी एकत्रितपणे प्रतिकार केला तर भाजपचा पराभव शक्य असल्याचे देखील बोलले जाते. नुकत्याच लागलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निकालाने विरोधकांमध्ये प्राण फुंकले गेले आहेत. आज (21 मे) रोजी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची दिल्लीत येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भाजप विरोधात देशातल्या सर्व विरोधी पक्षाची एकजूट बांधण्याच्या दृष्टीने ही भेट घेतली असल्याचे सांगितले जात आहे. सुप्रिम कोर्टाने दिल्लीतील प्रशासकीय बदल्यांचे हक्क देऊनही मोदी सरकारने अध्यादेश काढून निर्णय फिरवला. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी नितीश कुमार यांच्याकडे या अध्यादेशाविरोधात समर्थन मागितले. यावेळी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव तसेच आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह उपस्थित होते.
केंद्राच्या दिल्लीत एनसीसीएसए स्थापन करण्याच्या अध्यादेशाविरोधात अरविंद केजरीवाल म्हणाले की, "मी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहे. त्यानंतर मी देशातील सर्व पक्षांच्या अध्यक्षांची देखील भेट घेणार आहे. आज मी नितीशजींना सर्व पक्षांशी बोलण्याची विनंती केली. राज्यसभेत हे विधेयक आल्यावर मी प्रत्येक राज्यात जाऊन समर्थन मागेल." असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
या भेटीनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, "सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर देखील केंद्र सरकार जे काही करत आहे ते विचीत्र आहे. विरोधकांनी एकजूट दाखवली पाहीजे. विरोधकांना एकत्र येत अभियान राबवाव लागेल. आम्ही केजरीवाल यांच्या सोबत आहोत." असे नितीश कुमार म्हणाले आहेत.
यावेळी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले की, "केजरीवाल ज्या समस्यांना समोरे जात आहेत. त्याविरोधात त्यांना पाठींबा देण्यासाठी आम्ही आलो आहोत. दिल्लीत भाजप सरकार असते तर उपराज्यपालांना असे काम करण्याची हिंमत झाली असती का? दिल्लीत भाजप पु्न्हा कधीच येणार नाही." अशी प्रतिक्रिया तेजस्वी यादव यांनी दिली आहे.