‘सोने से कम नहीं, खोने से गम नहीं’; सध्याच्या कार्यकर्त्यांची स्थिती

सध्याचे नेते सकाळचा चहा एका पक्षाच्या नेत्यांसोबत पितात आणि दुपारी दुसऱ्या पक्षकार्यालयात जाऊन पक्षप्रवेश करतात. नेत्यांचीच जिथे ही अवस्था आहे, तिथे कार्यकर्त्यांनी काय करावे?
‘सोने से कम नहीं, खोने से गम नहीं’; सध्याच्या कार्यकर्त्यांची स्थिती

प्रतिनिधी/मुंबई

सध्याचे नेते सकाळचा चहा एका पक्षाच्या नेत्यांसोबत पितात आणि दुपारी दुसऱ्या पक्षकार्यालयात जाऊन पक्षप्रवेश करतात. नेत्यांचीच जिथे ही अवस्था आहे, तिथे कार्यकर्त्यांनी काय करावे? पूर्वीचा कार्यकर्ता निष्ठावान, कडवट आणि कट्टर असायचा. अशा कार्यकर्त्यांच्या जीवावरच पक्ष वाढले, मोठे झाले. पण आज नेत्यांनीच पक्षाशी वैचारिक बांधिलकी ठेवलेली नाही. त्यामुळे कार्यकर्तादेखील प्रोफेशनल झाला आहे. आजचा कार्यकर्ता हा ‘सोने से कम नहीं, खोने से गम नहीं’ असा झाला आहे.

पूर्वी कार्यकर्ता हा पक्षाची जान असायची. नेत्याच्या एका आदेशानुसार काहीही करण्याची त्याची तयारी असायची. शिवसेना हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अशा कडवट आणि कट्टर शिवसैनिकांच्या साथीनेच शिवसेना वाढविली. बाळासाहेबांनी आदेश द्यायचा अवकाश, एका तासात मुंबई बंद करून दाखविण्याची ताकद या शिवसैनिकांच्या मनगटात होती. शिवसेनेची महिला आघाडीदेखील तितकीच कडवट, किंबहुना काकणभर आणखीनच कट्टर होती. काँग्रेस पक्ष हा हिंसेवर चालणारा नसला तरी काँग्रेसचा कार्यकर्ता हा विचाराने भारलेला असायचा. काँग्रेसी विचारांनीच तो चालायचा. पक्षाचा उमेदवार कोणीही असो, त्यासाठी कायम काम करणारा असायचा. कम्युनिस्ट कार्यकर्ता हादेखील असाच कडवट असायचा. पक्षासाठी त्याने त्याचे जीवन समर्पित केलेले असते. जुन्या विचारधारांचे पक्ष कोणतेही असो, पण कार्यकर्ते हे मात्र त्या विचारधारेला वाहिलेले असतात. पूर्वीचा जनसंघ असो वा आताचा भाजप, या पक्षालाही असेच निष्ठावान कार्यकर्ते मिळाले आहेत.

पण सध्या एकूणच राजकारणात साधनशुचिता नावाची गोष्टच उरलेली नाही. ज्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना पक्षबांधिलकी, शिस्त आणि अनुशासन शिकवायचे. तेच नेते आज या गोष्टींना जुमानत नाहीत. सकाळी एका पक्षात तर दुपारी दुसऱ्याच पक्षात प्रवेश, अशी आजच्या नेत्यांची अवस्था आहे. यामुळे कार्यकर्ता पण सैरभैर झाला आहे. इतकी वर्षे ज्या पक्षाच्या ध्येयधोरणांविरोधात काम केले, नाक्यांवर भाषणे ठोकली, त्याच पक्षाचे उपरणे घालून आज त्या कार्यकर्त्याला नव्या पक्षाच्या ध्येयधोरणांचे मार्केटिंग करावे लागत आहे. कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यामुळे प्रोफेशनल दृष्टिकोन स्वीकारला आहे. पूर्वीचा कार्यकर्ता घरचे विकून, स्वत: जेलमध्ये जाऊन पक्ष वाढवायचा. आजचा कार्यकर्ता हा आधी आपल्याला फायदा काय, हे पाहूनच नेत्याचे काम करायला लागला आहे. अर्थातच याला प्रामाणिक कार्यकर्त्यांचा अपवाद आहेच. पण आयात नेते-कार्यकर्ते या आयातांच्या मांदियाळीत खरा कार्यकर्ता कुठे तरी हरवला आहे. त्याच्या मनात हे शल्य बोचते आहे. की यासाठीच आपण हा पक्ष इतका वाढवला का? कधी तरी सर्व पक्ष आपल्या या निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय देतील, अशा अपेक्षेत ते बिचारे आहेत. अन्यथा सध्या ‘सोने से कम नहीं, खोने से गम नहीं’ अशाच कार्यकर्त्यांची चलती आहे.

logo
marathi.freepressjournal.in