सूर्यचंद्र असेपर्यंत कोणी संविधान बदलू शकणार नाही- एकनाथ शिंदे

संविधान बदलणार असे खोटे नरेटिव्ह विरोधी पक्षाने पसरविले. जनतेला फसवून मते मिळवली. पण जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत कोणीही संविधान बदलू शकत नाही.
एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे संग्रहित फोटो

प्रतिनिधी/मुंबई

संविधान बदलणार असे खोटे नरेटिव्ह विरोधी पक्षाने पसरविले. जनतेला फसवून मते मिळवली. पण जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत कोणीही संविधान बदलू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तर शपथ घेताना संविधान कपाळाला लावले आहे. लोकसभेत ठाकरे गटापेक्षा आमचा स्ट्राईक रेट जास्त राहिला आहे. यांच्यासारखे घरी बसून आम्ही काम करत नाही, तर लोकांच्या दारी जाउन काम करणारे हे सरकार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी किंवा अन्य कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही. येत्या अधिवेशनादरम्यान होणा-या सर्वपक्षीय बैठकीत सगळयांची मते ऐकून घेउनच निर्णय करू असेही ते म्हणाले. मुंबईमध्ये ३०० एकरांवर जागतिक दर्जाचा सेंट्रल पार्क होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरेंच्या निरोपाचे अधिवेशन या टिकेवर, अरे निरोप द्यायला सभागृहात यावे लागते घरी बसून होत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

गुरूवारपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृह येथे चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आयोजित पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील यावेळी सोबत उपस्थित होते.

जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न- अजित पवार

विरोधी पक्षाने दिलेल्या पत्रात मनुस्म़तीच्या श्लोकाचा उल्लेख केला आहे. पण मनुस्मृतीतला कुठल्याही प्रकारचा श्लोक शाळेच्या पुस्तकात नाही. विरोधी पक्षाने याबाबतचा मुददा उठविण्याची गरजच नव्हती. हा शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. जाणीवपूर्वक नरेटिव्ह सेट करण्याचा विरोधकांचा हा प्रकार असून जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न ते करतात. हे महाराष्ट्राला परवडणारे नाही. आमचे कधीच याला समर्थन नाही उलट विरोधच आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदे आल्यानंतर त्यांनी कुठलेही अधिवेशन गुंडाळलेले नाही. दिवसभर कामकाज चालते. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर राज्य सरकारकडे आहे, असेही अजित पवार म्हणाले.

विरोधकांच्या खोट्या नरेटिव्हचा पर्दाफाश करणार- देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षाचे पत्र म्हणजे खोटे बोल पण रेटून बोल असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटे नरेटिव्ह तयार करण्याची फॅक्टरी यांनी उघडली आहे, त्याचा पर्दाफाश या अधिवेशनात आम्ही निश्चित करू. गँगस्टर आणि ड्रग्जच्या बाबत हे बोलतात तेव्हा ते १०० कोटींच्या बाबत उच्च न्यायालयाने यांच्याच गृहमंत्र्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करून अटक करायला लावली. ड्रग्जच्या विरोधात आम्ही संपूर्ण देशभरात लढाई सुरू केली आहे. साठे मोठया प्रमाणात सापडत आहेत ते याच कारवाईमुळे. पुण्यात पोर्शे प्रकरण दुर्देवीच होते पण त्यातही कोणाला सोडणार नाही. कायदा सुव्यवस्था व ड्रग्जबाबत आमची झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे. हमीभाव वाढला नाही म्हणतात. पण दहा वर्षातील हमीभावाचे उत्तर त्यांना विधिमंडळात देऊ. जितकेवेळा विरोधी पक्ष आमच्याकडे एक बोट उगारते, तेव्हा चार बोटे त्यांच्याकडेच असतात. कोविडमध्ये घोटाळे, खिचडीचे घोटाळे विरोधी पक्ष विसरलेला दिसतोय, ते सर्व आम्ही बाहेर काढणार असल्याचा इशाराही फडणवीस यांनी दिला.

logo
marathi.freepressjournal.in