लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक अटळ! NDA कडून ओम बिर्ला, विरोधकांकडून के. सुरेश; उपाध्यक्षपदाची विरोधकांची मागणी फेटाळली

नव्या लोकसभेच्या अध्यक्षांची निवड एकमताने व्हावी यासाठी सुरू असलेले प्रयत्न अखेर निष्फळ ठरले आहेत.
लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक अटळ! NDA कडून ओम बिर्ला, विरोधकांकडून के. सुरेश; उपाध्यक्षपदाची विरोधकांची मागणी फेटाळली
FPJ

नवी दिल्ली : नव्या लोकसभेच्या अध्यक्षांची निवड एकमताने व्हावी यासाठी सुरू असलेले प्रयत्न अखेर निष्फळ ठरले आहेत. केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ एनडीएने अध्यक्षपदासाठी गेल्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनाच पसंती दिली आहे, मात्र विरोधकांनी काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य के. सुरेश यांना अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात उतरविल्याने आता निवडणूक अटळ आहे.

बिर्ला यांना पाठिंबा देण्याची तयारी इंडिया आघाडीने दर्शविली, मात्र उपाध्यक्षपद विरोधी पक्षांना द्यावे, अशी त्यासाठी पूर्वअट घातली. भाजपने ही अट मान्य करण्यास नकार दिला. त्यामुळे विरोधकांनी अखेरच्या क्षणी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला.

विरोधकांच्या वतीने काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाळ आणि द्रमुकचे नेते टी. आर. बालू यांनी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, जे. पी. नड्डा यांच्याशी राजनाथ सिंह यांच्या कार्यालयात चर्चा केली. मात्र, दोन्ही बाजूचे सदस्य आपापल्या भूमिकेशी ठाम राहिले. त्यानंतर विरोधी पक्षांचे दोन्ही सदस्य तेथून निघून गेले. सत्तारूढ पक्ष परंपरेचे पालन करीत नसल्याचा आरोप वेणुगोपाळ यांनी केला आणि बिर्ला यांच्याविरोधात उमेदवार रिंगणात उतरविण्याचा निर्णय जाहीर केला. केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि जेडीयूचे ललनसिंह यांनी, विरोधी पक्ष दबावाचे राजकारण करीत असल्याचा आरोप केला.

एनडीएकडे २९३ सदस्यांचे संख्याबळ आहे, तर विरोधकांकडे २३३ इतके संख्याबळ आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे दोन मतदारसंघातून विजयी झाल्याने सध्या लोकसभेतील एकूण सदस्यसंख्या ५४२ इतकी आहे.

ओम बिर्ला यांचा उमेदवारी अर्ज दाखल

कोटा मतदारसंघातील भाजपचे खासदार ओम बिर्ला यांनी मंगळवारी एनडीएचे लोकसभा अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. एनडीएतील सर्व घटक पक्षांनी बिर्ला यांच्या उमेदवारीला एकमताने पाठिंबा दिल्याचे केंद्रीय मंत्री ललनसिंह यांनी सांगितले.

काँग्रेसकडून खासदारांना व्हिप जारी

लोकसभा अध्यक्षपद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या सर्व खासदारांना व्हिप जारी केला आहे. तीन ओळीचा हा व्हिप असून काँग्रेस पक्षाच्या सर्व खासदारांना बुधवारी, सकाळी ११ वाजता सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सकाळी ११ वाजेपासून ते संसदेचे कामकाज संपेपर्यंत सभागृहात हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी असतील, अशा आशयाचे पत्र काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहारी माहताब यांना लिहिले असल्याची माहिती काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाळ यांनी दिली.

...तर सत्तारूढ पक्षाला पाठिंबा - राहुल

परंपरेचे पालन करून लोकसभेचे उपाध्यक्षपद विरोधी आघाडीला दिल्यास आम्ही सत्तारूढ पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी रचनात्मक सहकार्याची अपेक्षा करतात, परंतु त्यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आश्वासन दिल्याप्रमाणे योग्य प्रतिसाद दिला नाही, हा अपमान आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in