अजित पवार गटाच्या मंत्र्चांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटर येथे अचानक जात भेट घेतली. अचानकपणे घेतलेल्या या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे नेते तसंच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत या भेटीवर म्हणाले की, अजित पवार हे सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. पंतप्रधान मोदींनी केलेला विकास दादांना चांगला वाटतोय. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देकील गतिमान काम करत असून आता अजित दादा त्यांच्या सोबत आले आहेत.
अजित पवार यांनी शरद पवार साहेबांची भेट का घेतली हे त्यांनाच विचारावं लागेल. येत्या काळात त्यांनाच हे जाहीर करावं लागेल. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असू शकतो. शिंदे साहेब, फडणवीसजी आणि अजित दादा हे तिघे सध्या एकत्र आले असल्याने येत्या काळात राज्य सरकार वेगाने काम करेल, यात शंका नसल्याचं सामंत म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मोजक्या शब्दात यावर प्रतिक्रिया दिली आहे. मला याची काही कल्पना नसल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी पवार साहेबांची भेट घेतली असेल तर त्यात वेगळं नाही. कारण शरद पवार हे वर्षानुवर्षे त्यांचे नेते राहीलेले आहेत. त्यामुळे या भेटीत काही वावगं आहे असं मला वाटत नाही. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
शिवसेना-भाजप सरकारशी हातमिळवणी केल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार यांनी सर्व मंत्र्यांसह शरद पवार यांची भेट घेतल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.