अशोक चव्हाणांना मात देण्यासाठी भाजपने कंबर कसली; 10 जूनला अमित शाहांच्या सभेचं नांदेडमध्ये आयोजन

1 ते 30 जून या दरम्यान देशातल्या प्रत्येक लोकसभा मतदार संघात मोदी @9 विशेष जनसंपर्क अभियान राबवलं जाणार आहे.
अशोक चव्हाणांना मात देण्यासाठी भाजपने कंबर कसली; 10 जूनला अमित शाहांच्या सभेचं नांदेडमध्ये आयोजन

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. भाजपने तर आतापासूनच आगामी लोकसभेसाठी कंबर कसली आहे. त्यासाठी भाजपचे गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे सर्व नेते, कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. भाजपने सुरुवातीला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्याला लक्ष केलं आहे. त्यासाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपने अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी तयारी सुरु केल्याचं दिसून येत आहे. येत्या 10 जून रोजी नांदेडमध्ये अमित शाहांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

30 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सरकारला नऊ वर्षे पुर्ण झाली आहेत. यानिमित्ताने 1 ते 30 जून या दरम्यान देशातल्या प्रत्येक लोकसभा मतदार संघात मोदी @9 विशेष जनसंपर्क अभियान राबवलं जाणार आहे. या अनुषंगाने 10 जून रोजी नांदेडमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. संध्याकाळी 5 वाजता नांदेडमधील अबचलनगर, बाफना येथे या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात राबवण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत जिल्हा, मंडळ शक्ती केंद्र व बूथ पातळीवर वेगवेगळे कार्यक्रम घेत सरकारच्या योजना सर्वांपर्यंत पोहचवण्यात येणार आहेत. संपर्क से समर्थ यापासून सुरु झालेल्या या अभियानात भाजपचे सर्व नेते, मंत्री सहभाग घेणार आहेत. यात एका मंत्र्याला दोन लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा नांदेड दौरा आयोजित करण्यात आला आहे.

नांदेड हा आधीपासून काँग्रेसचा गड मानला जातो. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची जिल्ह्यात मोठी ताकद आहे. महाविकास आघाडी आगामी निवडणुका एकत्र लढल्यास भाजपच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे भाजपने नांदेडवर लक्ष केंद्रीत करत अशोक चव्हाण यांच्या अडचणी वाढवण्याचं ठरवलं असल्याचं सांगितलं जात आहे. नांदेडच्या अबचलनगर येथील खुल्या मैदानात होणाऱ्या या सभेची भाजपकडून जय्यत तयारी सध्या सुरु आहे. या सभेला 50 हजाराहून अधिक लोक येणार असल्याचा दावा नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in