'हा तर सत्तेचा माज अन् भाजपच्या घाणेरड्या...', विरोधकांचा हल्लाबोल

कांबळेंवर कठोर कारवाई करण्याची विरोधकांची मागणी
'हा तर सत्तेचा माज अन् भाजपच्या घाणेरड्या...',  विरोधकांचा हल्लाबोल
PM

भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे आमदार सुनील कांबळे यांनी थेट राष्ट्रवादीच्या वैद्यकीय सेलच्या अध्यक्षाला धक्काबुक्की करत कानशिलात मारल्याचा प्रकार घडला. त्यानंतर त्यांनी पोलीस कर्मचाऱ्याच्याही थोबाडीत लगावली. हा सगळा प्रकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ससून रुग्णालयात पाहणी दरम्यान घडला. उल्लेखनीय म्हणजे एक दिवसापूर्वीच राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनीही त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी करणाऱ्यांना घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली होती. त्यानंतर लगेचच हा प्रकार समोर आल्याने विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हा 'सत्तेचा माज' असल्याचा घणाघात करत कांबळेंवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

काय म्हणाले वडेट्टीवार?

"काल अब्दुल सत्तार, आज भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी दाखवला सत्तेचा माज ...भाजप आमदाराची मस्ती इतकी की ड्युटीवर असलेल्या पोलीस जवानाच्या थोबाडीत हाणली, थेट खाकी वर्दीला हात घालण्याची हिंमत सत्ताधारी आमदारामध्ये आली कशी? गृहमंत्री याची दखल घेणार का? पोलिस अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळे यांच्यावर कारवाई करावी, नाहीतर पोलिसांवर तक्रार न करण्याचा दबावही टाकला जाऊ शकतो...", अशा शब्दांत वडेट्टीवारांनी आसूड ओढला आहे.

भाजपच्या घाणेरड्या संस्कृतीचे दर्शन -

काल परवा अब्दुल सत्तारांचा एक कार्यक्रमातील बीभत्स भाषा असलेला व्हिडिओ प्रसारमाध्यमांसोर आला आणि आज महाराष्ट्रात भाजप आमदार सुनील कांबळे यांनी पोलीस अधिकाऱ्याला श्रीमुखात मारण्याचा प्रकार उघडकीस आला! हे सर्व कृत्य यांचा सत्तेचा माज व भाजपच्या घाणेरड्या संस्कृतीचे दर्शन घडवते, जनसमुदायासमोर काय बोलावे आणि कायद्याच्या रक्षकांशी कसा व्यवहार करावा हे लोक प्रतिनिधींना जर समजत नसेल तर, ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी शोकांतिका आहे. थेट खाकी वर्दीला हात घालण्याची हिंमत या सत्ताधारी आमदारामध्ये आलीच कशी? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित करत गृहमंत्र्यांनी याची गंभीर दखल घ्यावी आणि सदर आमदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

कांबळेंची सारवासारव -

दरम्यान, मी पोलिसाच्या कानशिलात लगावली नाही. कानशिलात लगावणे हा वेगळा प्रकार असतो. मी फक्त त्याला धक्का दिला. त्याने माझे शर्ट खेचला होता. ती व्यक्ती कोण होती हेही मला माहित नव्हते, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न कांबळे यांनी केला आहे. तर, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यालाही मारहाण केली नाही असे सांगताना, 'मला त्याने तीनवेळा धक्का मारला म्हणून, हा कोण आहे? याकडे जरा बघा, असे मी पोलिसांना सांगितले. तेव्हा पोलिसांनी त्याला मारले, मी उलट त्याला सोडवायला गेलो होतो, असे स्पष्टीकरण कांबळे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिले आहे.

logo
marathi.freepressjournal.in