विरोधक एकत्र बसून रणनीती ठरवतील - पवार

विरोधक एकत्र बसून रणनीती ठरवतील - पवार

केंद्रीय तपास यंत्रणांविरुद्ध ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांना केलेल्या आवाहनाला राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिसाद दिला आहे. ममता बॅनर्जी यांच्या सल्ल्यानुसार आता विरोधी पक्ष केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईविरोधात एकत्र बसून रणनीती ठरवतील, असेही पवार यांनी सांगितले. ते मंगळवारी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.

शरद पवार यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बिगरभाजप राज्यांचे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना पाठवलेल्या पत्रासंदर्भातही येथील एका कार्यक्रमात भाष्य केले. ममता बॅनर्जी यांनी या पत्राच्या माध्यमातून काही सल्ले दिले आहेत. बिगरभाजप राज्यांनी एकत्र येऊन केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर रोखण्यासाठी काहीतरी ठरवले पाहिजे. रणनीती निश्चित केली पाहिजे, असे ममता बॅनर्जी यांचे म्हणणे आहे. त्यानुसार, “आता विरोधी पक्षाचे नेते संसदेत भेटून याविषयी चर्चा करतील,” असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटासंदर्भातही बोलले. “काश्मिरी पंडित विस्थापित झाले, तेव्हा केंद्रात भाजपच्या पाठिंब्यावर व्ही. पी. सिंह यांचे सरकार होते. मुफ्ती मोहम्मद गृहमंत्री होते. तर काश्मीरचे राज्यपाल कोण होते, हे सर्वांनाच माहिती आहे. आज ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या माध्यमातून मुद्दा निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. देशातील धर्मनिरपेक्षतेवर भाजपचा विश्वास नाही. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही” असेही शरद पवार यांनी सांगितले. “काश्मिरी पंडित विस्थापित झाले हे देशासाठी चांगले झाले नाही; पण जे झाले ते विसरून समाजात एकोपा कसा राहील, हे पाहिले पाहिजे,” असे शरद पवार यांनी यावेळी म्हटले.

देशमुखांवर ११० धाडी

“महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कुटुंबीयांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी आतापर्यंत ११० धाडी टाकल्या आहेत. एकाच व्यक्तीविरोधात आणि त्याच्या कुटुंबीयांवर इतक्या धाडी पडण्याचा प्रकार आजपर्यंत तुम्ही बघितला आहे का?” असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपस्थित केला. अनिल देशमुख यांच्या कुटुंबीयांवर ईडीने ५०, सीबीआयने ४० आणि प्राप्तिकर खात्याने आतापर्यंत २० धाडी टाकल्याचा उल्लेखही पवार यांनी केला.

-----------------------------------

Related Stories

No stories found.