बुलढाण्यातील औरंगजेबच्या कथित घोषणाबाजीप्रकरणी ओवैसींचं स्पष्टीकरण

खोट्या बातम्या प्रसारित करण्यावरुन त्यांनी माध्यमांवरही संताप व्यक्त केला
बुलढाण्यातील औरंगजेबच्या कथित घोषणाबाजीप्रकरणी ओवैसींचं स्पष्टीकरण
Published on

एमआयएमचे प्रमुख व खासदार असदुद्दीन ओवेसी यांचं नुकतंच बुलढाणा येथे भाषण झालं. या सभेदरम्यान औरंगजेबच्या नावाच्या घोषणा दिल्या गेल्याचा दावा केला जात असून याबाबतचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर राज्यातील विविध नेत्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

यानंतर खासदार ओवैसी यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. बुलढाणा येथील सभेत अशा कोणत्याच घोषणा दिल्या गेल्या नसल्याचं ओवैसी यांनी सांगितलं. यावेळी खोट्या बातम्या प्रसारित करण्यावरुन त्यांनी माध्यमांवरही संताप व्यक्त केला.

बुलढाणा येथील सभेत दिलेल्या कथित घोषणाबाजीबद्दल विचारलं असता. असदुद्दीन ओवैसी यांनी संताप व्यक्त करत म्हटलं की, तुम्ही किती खोट्या बातम्या पसरवाल. मुस्लिमांचा किती द्वेश कराल. तुम्ही खोट्या बातम्या का चालवत आहात? तुम्ही घोषणा ऐकल्या आहेत का? त्याठिकाणी पोलीस नव्हते का? अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.

या कथित घोषणाबाजीप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपला प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मी सातत्याने म्हणतो की, या औरंग्याच्या औलादी कुठून पैदा झाल्या? महाराष्ट्रात आणि देशात औरंगजेबाचे वंशज नाहीत. औरंगजेब या देशावर राज्य करण्यासाठी, हिंदुंवर आत्याचार करण्यासाठी, आमच्या माताबहिंणींची अब्रु लुटण्यासाठी आला होता, त्यामुळे तो कुठल्याही राष्ट्रीय मुसलमानाचा नायक होऊ शकत नाही. असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यातील कोल्हापूर येथे औरंगजेबचे फोटो स्टेटसला ठेवल्यावरुन मोठा हिंसाचार उफाळून आला होता. तसंच अहमदनगर येथे देखील उरुस मिरवणुकीत औरंगजेबचे बॅनर नाचवल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

logo
marathi.freepressjournal.in