पाकव्याप्त काश्मीर स्वत:हून भारतात विलीन होईल! राजनाथ सिंह यांचा दावा; बळाचा वापर गरजेचा नाही

पाकव्याप्त काश्मीरवरील दावा भारत कधीही सोडणार नाही, तसेच हा प्रदेश बळजबरीनेही काबीज करणार नाही, काश्मीरमधील विकास पाहून पाकव्याप्त काश्मीरमधील जनताच स्वत:हून भारतात विलीन होण्याची इच्छा व्यक्त करील, असा दावा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे.
पाकव्याप्त काश्मीर स्वत:हून भारतात विलीन होईल! राजनाथ सिंह यांचा दावा; बळाचा वापर गरजेचा नाही

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरवरील दावा भारत कधीही सोडणार नाही, तसेच हा प्रदेश बळजबरीनेही काबीज करणार नाही, काश्मीरमधील विकास पाहून पाकव्याप्त काश्मीरमधील जनताच स्वत:हून भारतात विलीन होण्याची इच्छा व्यक्त करील, असा दावा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे.

‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये संरक्षण मंत्र्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे आणि या केंद्रशासित प्रदेशामध्ये सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (एएफएसपीए) अधिक काळ गरजेचा राहणार नाही, असे राजनाथ सिंह म्हणाले.

तथापि, हा विषय केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारितील आहे आणि गृह मंत्रालय योग्य निर्णय घेईल, येथे निवडणुकाही होतील, असे संरक्षण मंत्री म्हणाले. मात्र, त्यांनी त्याबाबतची मुदत स्पष्ट केली नाही. भारताला काहीही करण्याची गरजच राहणार नाही, जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती बदलली आहे. या प्रदेशात आर्थिक विकास झपाट्याने होत आहे, शांतता नांदत आहे, हे पाहता पाकव्याप्त काश्मीरमधील जनताच स्वत:हून भारतात विलीन होण्याची मागणी करील असे वाटते, असेही राजनाथ सिंह म्हणाले.

पाकव्याप्त काश्मीर भारतात आणण्यासाठी आपल्याला बळाचा वापर करावा लागणार नाही, आपण भारतात विलीन झाले पाहिजे, असे तेथील जनताच म्हणेल, अशा प्रकारची मागणी होऊ लागली आहे. पाकव्याप्त काश्मीर आपलाच होता, आहे आणि राहील, असेही संरक्षण मंत्री म्हणाले.

राहुल यांच्यात धग नाही, मात्र काँग्रेस आगीशी खेळत आहे

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यात धग नाही, मात्र निवडणुकीत लाभ व्हावा यासाठी काँग्रेस पक्ष हिंदू-मुस्लिम फूट पाडण्याचा प्रयत्न करून आगीशी खेळत आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.

केंद्रात भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यास आम्ही समान नागरी कायदा आणि एक देश एक निवडणूक यांची अंमलबजावणी करणार, असे ते म्हणाले. निवडणुकीत एनडीए ४०० पार करणार आणि भाजपला ३७० जागा मिळणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. स्थितीचा परिपूर्ण आढावा घेतल्यानंतरच आम्ही हा दावा करीत आहोत, हा पोकळ दावा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस सामाजिक सलोख्याला बाधा आणत आहे, सत्ता स्थापन करण्यासाठी राजकारण करू नये. राजकारणाचा उद्देश देश उभारणीचा हवा, अशी आपली त्यांना सूचना आहे, असेही राजनाथ म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in