ममतांच्या बैठकीत १६ पक्षांचा सहभाग, राष्ट्रपतीपदासाठी गोपाल गांधी, फारुख अब्दुल्लांच्या नावांचा प्रस्ताव

शरद पवार हे राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत उतरण्यास राजी नाहीत. या बैठकीनंतर शरद पवार यांनी आम्ही विविध नावांवर सर्वांशी चर्चा करत असल्याचे सांगितले
ममतांच्या बैठकीत १६ पक्षांचा सहभाग, राष्ट्रपतीपदासाठी गोपाल गांधी, फारुख अब्दुल्लांच्या नावांचा प्रस्ताव
ANI
Published on

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी बुधवारी दिल्लीत झालेल्या विरोधकांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत गोपाल गांधी आणि फारुख अब्दुल्ला यांच्या नावांचा प्रस्ताव ठेवण्यात आला. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही बैठक बोलावली होती. या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या नावाचा आग्रह शिवसेनेने धरला. मात्र, शरद पवार हे राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत उतरण्यास राजी नाहीत. या बैठकीनंतर शरद पवार यांनी आम्ही विविध नावांवर सर्वांशी चर्चा करत असल्याचे सांगितले.

या बैठकीत शिवसेना आणि काँग्रेससह १६ पक्षांचा सहभाग होता. संपूर्ण विरोधी पक्षांकडे एकच उमेदवार असावा, यावर सर्वांचे एकमत झाले. या बैठकीत आम आदमी पक्ष सहभागी झाला नाही. तर दुसरीकडे असदुद्दीन ओवैसीही निमंत्रण न मिळाल्याने नाराज झाले. विरोधी पक्षांच्या या बैठकीचे अध्यक्षस्थान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भूषविले.

या बैठकीस माजी पंतप्रधान देवगौडा, ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल), मल्लिकार्जुन खरगे(काँग्रेस), अखिलेश यादव (उत्तर प्रदेश), मेहबुबा मुफ्ती (काश्मीर), सुभाष देसाई (महाराष्ट्र), ई करीम (केरळ), जयराम रमेश (काँग्रेस), प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी), टी. आर. बालू (तामिळनाडू), यशवंत सिन्हा (बिहार), रणदीप सुरजेवाला (काँग्रेस), प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना), ओमर अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फरन्स), राजा (तामिळनाडू) आदी १८ नेते उपस्थित होते.

केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील दरी वाढत चालली आहे, असे यापूर्वी कधीही घडले नाही. राज्य सरकारला अडचणीत आणण्यासाठी राज्यपाल कार्यालयांचा वापर केला जात आहे. याला विरोध दर्शविण्यासाठी सर्व विरोधी राज्यातील मुख्यमंत्र्यांची ऑगस्ट महिन्यात परिषद घेण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

शरद पवारांसाठी शिवसेना आग्रही

भाजप विरोधातील पक्षांना एकत्र आणण्याची सुरुवात महाराष्ट्राने केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी ही सुरुवात केली. केवळ राष्ट्रपती निवडीसाठी नव्हे तर सर्व विरोधी पक्षांनी एकजूट मजबूत केली पाहिजे. त्यामुळे शरद पवार यांनी ही निवडणूक लढवावी, असा शिवसेनेचा आग्रह आहे. त्यांचा नकार कायम राहिल्यास सर्वसामान्य, उज्ज्वल प्रतिमेचा शक्य झाल्यास राजकीय परिघाबाहेरचा उमेदवार निवडावा, अशी भूमिका शिवसेना नेते तसेच राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केली. यावेळी सर्व विरोधी पक्षाच्यावतीने संयुक्त निवेदन सादर करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in