राष्ट्रवादीत भाकरी फिरणार : महाविकास आघाडीतूनच लढण्यावर एकमत

शिबिरे आयोजित करून त्या शिबिराला पक्षाध्यक्ष शरद पवार स्वतः उपस्थित राहणार
राष्ट्रवादीत भाकरी फिरणार : महाविकास आघाडीतूनच लढण्यावर एकमत

राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जास्तीत जास्त जागा निवडून आल्या पाहिजेत. राज्यातल्या ताकदीवरच राष्ट्रवादी काँग्रेसची देशपातळीवर ओळख निर्माण होणार आहे. त्यासाठी पक्ष वाढीवर भर, नवीन चेहऱ्यांना संधी तसेच तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेले जिल्हा व तालुका अध्यक्ष बदलण्याचा विचार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत करण्यात आल्याचे समजते. याशिवाय लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र लढण्याबाबत बैठकीत एकमत झाल्याचे समजते. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी म्हणूनच आपल्याला एकत्रित निवडणूका लढवायच्या आहेत, असेही या बैठकीत स्पष्ट केले आहे.

लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची नव्याने बांधणी आणि रणनीती आखण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसची येथे बैठक झाली. या बैठकीनंतर बैठकीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, ‘‘लोकसभा मतदारसंघांबाबत आमची चर्चा झालेली नाही. तसेच निवडणुकांबाबत कोणतेही सूत्र ठरलेले नाही. विविध प्रसारमाध्यमांकडून आमच्या तिन्ही पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्यांना प्रश्न विचारले जातात. त्यांच्या उत्तरांवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा सर्व प्रश्नांना उत्तर टाळणे महत्वाचे असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘‘महिन्याच्या पहिल्या शनिवारी प्रत्येक गावात ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ हा कार्यक्रम घेण्यात येतो. यामध्ये गावप्रश्नापासून ते देशस्तरावरील प्रश्नांचा उहापोह होतो. त्यामुळे कोअर कमिटीच्या बैठकीत 'एक तास राष्ट्रवादीसाठी' या कार्यक्रमावर अधिक भर द्यायचा, असा निर्णय झाला. बूथ कमिट्यांचा कार्यक्रम अधिक भक्कम व सक्षम करण्यासाठी विभागीय स्तरावर नेत्यांच्या कमिट्या करुन त्या विभागस्तरावर पूर्ण कराव्यात, अशी चर्चा झाली. शिबिरे आयोजित करून त्या शिबिराला पक्षाध्यक्ष शरद पवार स्वतः उपस्थित राहणार आहेत. बूथ कमिट्यांची विभागस्तरावर काही नेत्यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे, अशी माहितीही पाटील यांनी यावेळी दिली.

शिवराज्याभिषेक सोहळा राज्यभर

राज्यात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याबाबत बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. त्र्यंबकेश्वरप्रकरणी तत्काळ एसआयटी स्थापन करण्यात आली, याबाबत पाटील यांनी आश्चर्य व्यक्त केले. ६ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३४९ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राज्यात राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे. तसेच १० जून २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसला २४ वर्षे पूर्ण होऊन राष्ट्रवादी काँग्रेस २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यामुळे अहमदनगर येथे जाहीर सभेचे आयोजन करुन हा वर्धापन दिन साजरा केला जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in