आपला दवाखान्यात लवकरच फिजिओथेरपी,मार्च अखेरपर्यंत आणखी ४८ दवाखाना सेवेत

ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२३ पर्यंत तब्बल ३२ लाख ५५ हजार ८२६ जणांवर उपचार-आरोग्य विभागाची माहिती
आपला दवाखान्यात लवकरच फिजिओथेरपी,मार्च अखेरपर्यंत आणखी ४८ दवाखाना सेवेत

मुंबई : आपला दवाखान्यात १४७ प्रकारच्या मोफत चाचण्या करण्यात येतात. आता लवकरच फिजिओथेरपी उपचार पद्धती सुरू करण्यात येणार आहे. घाटकोपर, माहिम या दोन ठिकाणी जागाची निवड करण्यात आली असून, तिसऱ्या ठिकणची जागा लवकरच निश्चित करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२३ पर्यंत तब्बल ३२ लाख ५५ हजार ८२६ जणांवर उपचार केले असून, मार्च २०२४ पर्यंत आणखी ४८ दवाखाना मुंबईकरांच्या सेवेत येतील, असे ही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

घराजवळ दवाखाना या संकल्पनेतून आपला दवाखाना ऑक्टोबर २०२२ मध्ये धारावीतून सुरू करण्यात आला. पालिकेच्या २२७ प्रभागात एक अशा प्रकारे एकूण २२७ आपला दवाखाना सुरु करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. सद्यस्थितीत २०२ आपला दवाखाना सुरू असून, मार्च अखेरपर्यंत आणखी ४८ आपला दवाखाना सुरु करण्यात येणार आहे. मार्च अखेरपर्यंत आपला दवाखान्याची संख्या २५०वर असेल, असा विश्वास पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी व्यक्त केला. दरम्यान, आपला दवाखान्यात १४७ प्रकारच्या चाचण्या करण्यात येतात. त्यात आता लवकरच फिजिओथेरपी उपचार पद्धती सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

१४७ प्रकारच्या मोफत चाचण्या

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी यासह १४७ प्रकारच्या रक्त चाचण्यांची सेवा मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त क्ष-किरण (एक्स-रे), सोनोग्राफी इत्यादी चाचण्यांसाठी पॅनलवरील डायग्नॉस्टिक केंद्रांद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दरात संबंधित वैद्यकीय सेवा उपलब्ध केली आहे. तसेच विशेष तज्ज्ञांच्या सेवा देखील पॉली क्लिनिक व डायग्नॉस्टिक सेंटरद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहे.

पॉलिक्लिनिक डॉयगनोस्टीक

सेंटरमध्ये तपासणी

ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२३

दाता संबधी उपचार - ३२,८४७

स्त्री संबधी उपचार - ७,१८५

त्वचा संबधी उपचार - १७,५१६

logo
marathi.freepressjournal.in