ना घर, ना जमीन...पंतप्रधान मोदींकडे किती आहे संपत्ती?

सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात जसोदा बेन यांची मोदींची पत्नी म्हणून उल्लेख केला असून त्यांच्याकडे किती मालमत्ता आहे, याबद्दल माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
ना घर, ना जमीन...पंतप्रधान मोदींकडे किती आहे संपत्ती?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी, १४ मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्यांदा वाराणसी येथून उमेदवारी अर्ज दाखल केला. पंतप्रधान मोदी यांच्याकडे ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असून त्यातील बहुतांश रक्कमही त्यांनी बँकेत फिक्स डिपॉजिट केल्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे. पंत्रप्रधान मोदी हे फेसबुक, मायक्रोब्लॉगिंग साइट एक्स, यूट्यूब, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर असल्याचेही त्यांनी प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे.

निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, मोदींची एकूण मालमत्ता ३ कोटी २ लाख ६ हजार ८८९ रुपये इतकी आहे. यातील २.८५ कोटींहून अधिक रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवली आहे. यात मोदींकडे २ लाख ६७ हजारांच्या चार सोन्यांच्या ४५ ग्रॅम वजनाच्या अंगठ्या आहेत. ५२ हजार ९२० रुपये रोख रक्कम आणि ९ लाख १२ हजार रुपये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवले आहेत.

पंतप्रधान मोदींकडे नाही घर

मोदींकडे घर आणि जमीन देखील नाही. त्याचबरोबर मोदींविरुद्ध कोणताही फौजदारी खटला प्रलंबित नाही किंवा त्यांना कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलेले नाही. या प्रतिज्ञापत्रात जसोदा बेन यांच्या मोदींची पत्नी म्हणून उल्लेख केला असून त्यांच्याकडे किती मालमत्ता आहे, याबद्दल माहिती नसल्याचे मोदींनी स्पष्ट केले आहे. पंतप्रधान अहमदाबादचे रहिवासी, राजकारणात सक्रीय आणि सार्वजनिक जीवन जगत आहेत,असा उल्लेख प्रतिज्ञापत्रात केला आहे. यात मोदींनी १९६७ मध्ये एसएससी केली आहे. १९७८ मध्ये दिल्ली विद्यापीठातून बीए आणि १९९८ मध्ये गुजरा विद्यापीठातून एम.ए केल्याची माहिती दिली आहे.

२०१४ आणि २०१९ मध्ये पंतप्रधान मोदींची संपत्ती

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींकडे गुजरातच्या गांधीनगरमधील निवासी भूखंडासह २.५ कोटी रुपयांची मालमत्ता, १.२७ कोटी रुपयांच्या फिक्स डिपॉझिट आणि ३८,७५० रुपयांची रोख रक्कम असल्याचे जाहीर केले होते. तसेच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींकडे एकूण १.६५ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती.

logo
marathi.freepressjournal.in