
‘माझ्या वडिलांना कुणी मारले, हे मला माहिती आहे, पण त्या मागे मास्टरमाइंड कोण होते?’ असा सवाल भाजप खासदार पूनम महाजन यांनी ‘मुंबईचा जागर’ कार्यक्रमात बोलताना उपस्थित केला आहे. तेव्हा तुम्ही सत्तेत होतात, असे म्हणत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा साधला. जर ५०-५० चा फॉर्म्युला ठरला होता तर मुंबई मनपात उद्धव ठाकरेंनी भाजपला महापौरपद का दिले नाही, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
महाजन म्हणाल्या, ‘‘उद्धव ठाकरेंनी मुंबईकर आणि मराठी माणसाचे नाव घेऊन राजकारण केले. राज्यात आता मराठी-गुजराती असा वाद निर्माण करताय? तुम्ही हे कदाचित विसरला असाल की गुजरात भाजपचे अध्यक्षदेखील मराठी आहेत. गुजरातमध्ये मराठी माणसाने जो झेंडा फडकवला, त्याचा अभिमान उद्धव ठाकरेंना नाही का, असा सवाल महाजन यांनी उपस्थित केला.
युतीमध्ये भांडण झाले, दोन भावांमध्ये महाभारत झाले हे घडवणारे शकुनी कोण होते, हे सर्वांना माहिती आहे. शकुनींनी सर्व घडवले आणि स्वत: सत्तेत जाऊन बसले. मी काही बोलले तर माझ्या वडिलांना कुणी मारले, असा प्रश्न हे सगळे विचारतील, पण माझ्या बापाला कुणी मारले हे मला माहिती आहे, तो प्रश्न निर्माण करुन काही होणार नाही, पण त्या मागे मास्टरमाइंड कोण होते? हे तुम्ही शोधून दाखवले नाही, असे म्हणत काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका केली आहे.