ओबीसी नेत्यांच्या बैठकीनंतर प्रकाश शेंडगें आक्रमक; म्हणाले, "रस्त्यावर उतरून..."

आम्हाला यापूर्वी महाराष्ट्र शासनाने शब्द दिला होता की, ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, असंही प्रकाश शेंडगे म्हणाले.
ओबीसी नेत्यांच्या बैठकीनंतर प्रकाश शेंडगें आक्रमक; म्हणाले, "रस्त्यावर उतरून..."

मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलवली असून ती बैठक आता संपली आहे. त्यानंतर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी काही माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं की, आता आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार आहोत. भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा न देता सरकारमध्येच राहून लढा द्यावा, अशी भूमिका घेतल्याचं शेंडगेंनी सांगितलं.

प्रकाश शेडगे पुढे बोलताना म्हणाले की, मंत्री छगन भुजबळांच्या सोबत आम्ही कायम राहणार. त्यांनी राजीनामा देऊन बाहेर पडायचं नाही. हक्काच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी रस्त्यावरची लढाई सुरु करत आहोत. दिवाळी झाल्यानंतर आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत आणि सरकारला निर्णय मागे घेण्यास भाग पाडणार आहोत. आम्ही सगळे आता संपूर्ण राज्यात आंदोलन उभं करणार आहोत. "जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा..." देशभरातील ओबीसी नेत्यांना आम्ही आवाहन करणार आहोत आणि लढा उभारण्यासाठी बोलवणार आहोत.

आम्हाला यापूर्वी महाराष्ट्र शासनाने शब्द दिला होता की, ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही.. मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊन आरक्षण हडपण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि यावर सरकार काही बोलत नाही. सुप्रीम कोर्टानं मराठ्यांना मागास नसल्याचं सिद्ध केलं आहे. आज कुणबी दाखले देऊन मागास ठरवण्याचा सरकारचा प्रयत्न चालू आहे. भुजबळ जे बोलले ते अगदी बरोबर आहे. न्यायमूर्तींनी अंतरवालीमध्ये जावून आरक्षण देण्याचं आश्वासन देणं हे साफ चुकीचं आहे. त्यामुळे आता आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

याआधी आणि आता सरकारनं ज्या समित्या नेमल्या आहेत. त्यामध्ये सर्वच मराठा सदस्य होते. त्यामुळे मराठा समाज हा मागास नाही, हे सिद्ध झालेलं आहे. आमची ६० टक्के लोकसंख्या आहे. सरकारला खाली खेचण्याची ताकद ओबीसींमध्ये असून रस्त्यावरच्या लढाईसोबत आम्ही न्यायालयीन लढाईदेखील लढणार आहोत, अशी भूमिका प्रकाश शेंडेगे यांनी मांडली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in