काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता राहुल एका वेगळ्या कारणाने चर्चेत आले आहेत. राहुल गांधी हे सध्या लडाख दौऱ्यावर आहेत. याठिकाणी ते आज सकाळी रायडर लूकमध्ये दिसले. यावेळी राहुल यांनी 'पँगॉन्ग त्सो' तलावापर्यंत बाईकराईड केली. त्यांच्या बाईक राईडचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात राहुल स्वत: बाईक चालवताना दिसत आहेत. २० ऑगस्ट रोजी भारतातचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती आहे. राहुल गांधी त्यांच्या वडिलांची जयंती पँगोन्ग त्सो तलावावर साजरी करणार आहेत. कलम ३७० आणि ३५ (A)रद्द केल्यानंतर आणि जम्मू हे कश्मीरपासून वेगळे झाल्यानंतर नवीन केंद्रशासित प्रदेशाची निर्मीतीनंतर राहुल यांचा हा पहिलाच लडाख दौरा आहे.
लडाख दौऱ्यादरम्यान राहुल गांधी हे कारगिल स्मारकावर गेले होते. यावेळी त्यांनी स्थानिक तरुणांशी संवाद साधला. लेहमध्ये त्यांनी फुटबॉलचा सामनाही पाहिला. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना राहुल हे फुटबॉलपटू होते. याआधी देखील राहुल २ दिवसांसाठी लडाख पोहोचले होते. पण इथे पोहोचल्यानंतर त्यांनी आपला प्लॅन बदलला आणि २५ ऑगस्टपर्यंत केंद्रशासित प्रदेशात राहण्याचा निर्णय घेतला. १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या कारगिल परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने भाजपविरोधात आघाडी केली आहे.
राहुल यांना बाईक चालवण्याची आवड आहे. याबाहबत त्यांनी स्वत: सांगितलं आहे. दिल्लीतील करोल बाग भागात मोटर मेकॅनिकशी संवाद साधला त्यांनी त्यांना बाईक चालवायला आवडत असल्याचं सांगितलं होतं. माझ्याकडे केटीएम बाईक असून ती तशीच पडून आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मला ती चालवता येत नाही, असं राहुल गांधी म्हणाले होते.
राहुल गांधी गुरुवारी लडाखला पोहचले. यावेळी लेह विमानतळावर पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं.राहुल गांधी यांनी या वर्षाच्या सुरुवातीला दोन वेळा श्रीनगर आणि जम्मूला भेट दिली आहे. जानेवारीत त्यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान ते जम्मू आणि श्रीनगरला गेले होते. तर फ्रेब्रुवारीत त्यांनी पुन्हा गुलमर्ग स्की रिसॉर्टला वैयक्तिक भेट दिली होती.