राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारावी; काँग्रेस कार्यकारिणी समितीची एकमताने विनंती

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाने केलेल्या लक्षणीय कामगिरीचे श्रेय पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या दोन भारत जोडो यात्रांना देत शनिवारी काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या (सीडब्ल्यूसी) सदस्यांनी राहुल गांधी यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारण्याची एकमताने विनंती केली.
राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारावी; काँग्रेस कार्यकारिणी समितीची एकमताने विनंती

नवी दिल्ली : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाने केलेल्या लक्षणीय कामगिरीचे श्रेय पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या दोन भारत जोडो यात्रांना देत शनिवारी काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या (सीडब्ल्यूसी) सदस्यांनी राहुल गांधी यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारण्याची एकमताने विनंती केली. मात्र याबाबत आपण लवकरच निर्णय घेऊ, असे राहुल गांधी यांनी सांगितल्याचे पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाळ यांनी सांगितले.

काँग्रेसच्या विस्तारीत कार्यकारिणी समितीची बैठक येथे पार पडल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत वेणुगोपाळ म्हणाले की, समिती सदस्यांनी एकमताने राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आहे.

काँग्रेसला २०१४ मध्ये सत्तेतून हद्दपार झाल्यानंतर प्रथमच लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळणार आहे. लोकसभेतील एकूण सदस्यसंख्येच्या १० टक्के जागाही काँग्रेस पक्षाला २०१४ आणि २०१९ मध्ये मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे पक्षाला विरोधी पक्षनेतेपदापासून वंचित राहावे लागले होते. निवडणुकीच्या निकालानंतर पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यात नवा उत्साह आला असून काँग्रेस पक्षाच्या पुनरुज्जीवनास सुरुवात झाली असल्याची भावना काँग्रेस कार्यकारिणी समितीची आहे, असे वेणुगोपाळ म्हणाले.

समितीच्या बैठकीत दोन ठराव मंजूर करण्यात आले. निवडणुकीत काँग्रेस पक्षाने केलेल्या लक्षणीय कामगिरीत पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वढेरा यांनी बजावलेल्या भूमिकेबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेलाही श्रेय देण्यात आले. लोकशाही, घटना, सामाजिक आणि आर्थिक न्याय यांच्या रक्षणासाठी मतदान केल्याबद्दल मतदारांचे आभार मानणारा ठरावही बैठकीत मंजूर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:च्या नावावर मते मागितली, मात्र मतदारांनी जो निवाडा केला त्यामुळे मोदींचा केवळ राजकीयच नव्हे तर व्यक्तिगत आणि नैतिक पराभव झाला आहे, असेही ठरावामध्ये म्हटले आहे.

काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी

काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची शनिवारी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी एकमताने फेरनिवड करण्यात आली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोनिया यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, त्याला गौरव गोगोई, के. सुधाकरन आणि तारिक अन्वर यांनी अनुमोदन दिले.

logo
marathi.freepressjournal.in