"आजवर न झालेले आकलन..."; आमदार अपात्रतेच्या निकालापूर्वी राहुल नार्वेकरांचं मोठं विधान

शिंदे गटाच्या १६ आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांचे भवितव्य ठरेल. संपूर्ण राज्यासह देशाचंही लक्ष लागलेल्या या निकालापूर्वी नार्वेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
"आजवर न झालेले आकलन..."; आमदार अपात्रतेच्या निकालापूर्वी राहुल नार्वेकरांचं मोठं विधान

गेल्या दीड वर्षापासून राज्यात सुरू असलेल्या उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील सत्तासंघर्षाचा फैसला अखेर आज (दि.१०) होणार आहे. विधानसेभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंबंधी दुपारी 4 वाजेपासून विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये निकाल वाचनास सुरूवात करतील. त्यानंतर शिंदे गटाच्या १६ आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांचे भवितव्य ठरेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही अपात्रतेची टांगती तलवार असल्याने संपूर्ण राज्यासह देशाचंही लक्ष लागलेल्या या निकालापूर्वी नार्वेकर यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

काय म्हणाले नार्वेकर?

“आजचा निकाल निश्चितपणे कायद्याला धरुन असेल. संविधानातील ज्या तरतुदी आहेत, त्या सर्वांचे पालन करून निकाल देणार आहोत आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या आदेशात जी तत्वे ठरवून दिलेली आहेत त्या आधारावरच हा निकाल असेल. या निर्णयातून सर्वांना न्याय मिळेल”, असे नार्वेकर म्हणाले. तसेच, संविधानाच्या १० व्या परिशिष्टाचे आजवर न झालेले आकलन या निकालाच्या माध्यमातून होणार आहे. आजवर दहाव्या परिशिष्टाचे आकलन योग्यरित्या झाले नव्हते, ते करण्याची गरज होती. या प्रकरणाच्या माध्यमातून आम्ही योग्य निर्णय घेणार असून त्याद्वारे दहाव्या परिशिष्टाबाबत एक पथदर्शी निकाल देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, निकालाच्या दोन दिवस आधी झालेल्या नार्वेकर व मुख्यमंत्र्यांमधील गुप्त भेटीबद्दल जोरदार आक्षेप घेताना, देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार की नाही हे ठरवणारा निकाल असेल, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे, तर लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते व आमच्याच बाजूने निकाल लागेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. एकूणच राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणाऱ्या या निकालाला आता अवघे काही तासच उरल्याने सगळ्यांची धाकधूक वाढली आहे.

logo
marathi.freepressjournal.in