अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना सोबत घेत भाजपशी केलेल्या हात मिळवणीवर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरच हल्लाबोल केला आहे. राज्यात जे काही सुरु आहे, ते किळसवाणं असल्याचं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. तसंच राज्यात सुरु असलेल्या घाणेरड्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनीच केली असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत. आज तुम्ही जनमताचा कौल घेतला तर प्रत्येक घरामध्ये शिव्या ऐकायला येतील, दुसरे काही येणार नाही, असं म्हणत त्यांनी राज्यातील सत्तानाट्यावर संताप व्यक्त केला आहे.
यावेळी त्यांनी या सत्तानाट्यामागे शरद पवार यांचाच हात असल्याची शंका असल्याचं म्हटलं आहे. प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ ही माणसं अजित पवार यांच्यासोबत जाणारी नाहीत, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. हे तीन माणसं संशयास्पद असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. शपथविधीनंतर सगळ्या होर्डिंग्जवर शरद पवार यांचे फोटो लावा असं अजित पवार म्हणाले होते. त्यामुळे हे अकालनिय असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
राज्यातील सत्तानाट्यावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले की, हे सत्तानाट्य अचानक घडल नसून याची चर्चा अनेक दिवसांपासून सृरु होती त्यात ती काल सगळ्या महाराष्ट्रसमोर आली, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच राज्यात घडलेल्या सत्तानाट्यावर बोलण्यासारख्या अनेक गोष्टी असून मेळाव्यात त्या सर्व गोष्टी मी स्पष्ट करेल, असं देखील ते म्हणाले. अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. त्यामुळे कोण कोणत्या पक्षात आहे याच उत्तर देताच येत नसल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी घड्याळाने काटा काढला की काट्याने घड्याळ काढलं यासंदर्भात काही बोलताच येत नाही, असा टोला देखील लगावला.