
मागील आठवड्यात राज्यात धमक्यांचं सत्र पहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीनं राज्यात खळबळ उडाली. यानंतर यंत्रणा वेगाला कामाला लागल्या आणि त्यांनी या धमकी देणाऱ्यांना ताब्यात घेतलं. आता या प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. संजय राऊत यांच्या प्रकणात पोलिसांनी मयुर शिंदे नावाच्या तरुणाला अटक केली आहे. मात्र मनसेने केलेल्या दाव्यामुळे या प्रकरणाला नवं वळण लागण्याची शक्यता निर्णाण झाली आहे. पोलिसांनी अटक केलेला मयुर शिंदे हा संजय राऊत यांना निकटवर्तीय असून राऊतांच्या सांगण्यावरुन त्याने धमकी देण्याचं नाटक केलं असल्याचा दावा मनसेने केला आहे.
यावेळी बोलताना मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत हा एक नंबरचा बोगस माणूस असल्याचं या प्रकरणातून सिद्ध झाल्याचं म्हटलं आहे. एखाद्या माणसाने किती खोट बोलावं, आपण किती खोटारडे आहोत हे राऊत यांनी सिद्ध केल्याचं देशपांडे यांनी म्हटलं आहे. लवाजमा वाढावा म्हणून म्हणून किती नाटकं करावी याचं उदाहरण म्हणजे संजय राऊत असं देखील ते म्हणाले आहेत.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, संजय राऊत यांनी राजकारण सोडून नाटकात काम केलं तर ते मोठं नाव कमावतील. म्हणजे तुम्ही तुमच्या माणसाला सांगायचं की मला धमकीचे फोन कर. तो माणून शिव्या घालण्याचं नाटक करतोय. सुनील राऊत त्याला शिव्या घालून उत्तर देत आहेत. किती ती नाटकं. या प्रकरणावरुन यांचे गँगस्टर लोकांशी कसे संबंध आहेत ते सिद्ध झालं आहे,
असं देखील देशपांडे म्हणाले आहेत.
पुढे बोलताना ते म्हणाले की, माझ्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव समोर आलं आहे. निलेश पराडकर असं त्यांच नाव असून तो देखील संजय राऊत आणि सुनील राऊत यांचा माणूस आहे. लोकांना मारण्याच्या सुपाऱ्या देण्याचं काम संजय राऊत करत आहेत. असा दावा त्यांनी केला आहे. तसंच मयुर शिंदे हा शिवसेनेचाचं कार्यकर्ता असून तो एक गँगस्टर आहे. राऊत यांच्याबरोबर त्याचे फोटो आहेत. अशा माणसांनी राजकारणात राहू नये. लोकांनी यांच्या पार्श्वभागावर लाथा मारुन त्यांना हाकलून दिलं पाहिजे, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. आता राऊत यांनी न घाबरता आणि न थुंकता यावर उत्तर दिलं पाहिजे. नाहीतर लोक त्यांच्यावर थुंकतील. आता महाराष्ट्राला तोंड कसं दाखवावं असा प्रश्न त्यांना पडला आहे. अशा खोटारड्या माणसाला आपण टीव्हीवर लाईव्ह दाखवायचं का याचा विचार तुम्ही केला पाहिजे, असं ते माध्यमांना म्हणाले आहेत.