राजीनाम्याचा निर्णय बदलला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात भाजपची असमाधानकारक कामगिरी झाल्याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची तयारी दर्शविणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला निर्णय बदलला असून यापुढेही लढत राहणार असल्याचे संकेत दिले.
राजीनाम्याचा निर्णय बदलला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात भाजपची असमाधानकारक कामगिरी झाल्याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची तयारी दर्शविणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला निर्णय बदलला असून यापुढेही लढत राहणार असल्याचे संकेत दिले. राज्यात महाविकास आघाडीतील तीन पक्षांसमवेतच नव्हे तर ‘खोटा प्रचार’ या चौथ्या विरोधी पक्षाशीही महायुतीला निवडणुकीत लढावे लागले, असे फडणवीस म्हणाले.

निवडणूक निकालानंतर पक्षाने आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आमचा विश्वास आहे आणि तेच आमचे नेते असतील, असा ठराव भाजपच्या आमदारांनी या बैठकीत केला. त्यावेळी फडणवीस यांनी चौथ्या विरोधी पक्षाबाबत भाष्य केले.

निवडणुकीत भाजपला जोरदार फटका बसला त्यामुळे उद्विग्न होऊन अथवा भावनेच्या आहारी जाऊन आपण राजीनामा देण्याची तयारी दर्शविली नव्हती, आपण पळपुटे नाही, लढत राहणारे आहोत, चारही बाजूंनी घेरले तरी पूर्ण ताकदीनिशी पुन्हा उभारी घेऊ शकतो आणि हेच आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलो, असेही फडणवीस म्हणाले.

दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, त्यांनीही आपल्याला काम करीत राहण्यास सांगितले आणि त्याप्रमाणे आपण काम करीत राहणार आहोत, विधानसभेच्या निवडणुकीसाठीची तयारी सुरू केली आहे. भाजपची घटना बदलण्याची इच्छा आहे, अशी अफवा पसरविण्यात आली त्यामुळे महायुती दुखावली गेली. चौथ्या विरोधी पक्षाची जाणीव आपल्याला चौथ्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर झाली, असेही फडणवीस म्हणाले.

शिवसेनेला (उबाठा) सहानुभूती मिळाल्याची चर्चा होती, मात्र त्यांच्या पक्षाला ठाणे आणि कोकणात फटका बसला, तेथे शिवसेनेला (उबाठा) एकही जागा मिळाली नाही. मुंबईत मराठी भाषकांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला नाही, विशिष्ट समाजाच्या एकत्रित मतांचा त्यांना लाभ झाला. वरळी, शिवडी, विक्रोळी आणि भांडुप या मराठीबहुल विधानसभा क्षेत्रात त्यांना कमी मताधिक्य मिळाले, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in