पाच राज्यांचं मतदान पार पडल्यानंतर आज चार राज्यांची मतमोजणी सुरु आहे. यात पहिल्या टप्प्यात चार पैकी तीन राज्यात भाजप मध्य प्रदेशचा गड राखून काँग्रेसकडून राजस्थान आणि छत्तीसगड देखील खेचून घेताना दिसत आहे. दुसरीकडे तेलंगणात मात्र काँग्रेसने जोरादर मुसंडी मारत केसीआर यांना मोठा धक्का दिला आहे. गेल्या दोन पंचवार्षीकपासून तेलंगणात बीआरएस पक्षाची सत्ता होती. तर के. चंद्रशेखर राव हे मुख्यमंत्री होते. मात्र काँग्रेसने बहुमताच्या दिशेने वाटचाल केली आहे.अंतिम निकाल येण अजून बाकी असलं तरीही काँग्रेसचा विजय निश्चित मानला जात आहे. तेलंगणात काँग्रेसचे विद्यमान खासदार रेवंत रेड्डी हे गेमचेंजर असल्याचं बोललं जात आहे.
रेवंत रेड्डी कोण आहेत?
खासदार रेवंत रेड्डी हे तेलंगणा काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष आहेत. रेड्डी यांचा तेलंगणा काँग्रेस संघटनेत दबदबा असून आक्रमक कार्यशैली आहे. त्यांच्या याकार्यशैलीमुळे अनेकदा ते टिकेचे धनी देखील ठरले. मात्र त्याचा त्यांना फायदाच झाल्याचं दिसून आलं. ५४ वर्षीय रेवंत रेड्डी यांनी काहीही झालं तरी काँग्रेसच्या विजयासाठी लिहिलेली स्क्रिप्ट बदलली नाही. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि बीआरएसचा गड असलेल्या कामारेड्डी मतदार संघातून ते स्वत: निवडणुक लढवत असून सध्या ते आघाडीवर आहेत.
रेवंत रेड्डी यांनी दोन वेळा आमदारकी भूषवली आहे. ते एकेकाळी चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगु देसम पक्षात होते. मात्र, २०२१७ मध्ये ते काँग्रेसमध्ये आले आणि त्यांनी काँग्रेसमध्ये झंझावात सुरु केला. काँग्रेसने देखील त्यांच्यावर पक्षाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी सोपवली. रेवंत रेड्डी यांनी देखील ती जबाबदारी यशस्वी पेलल्याचं दिसून येत आहे.
रेवंत रेड्डी हे सुरुवातील भाजपच्या नेतृत्वातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत कार्यरत होते. यानंतर ते चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगु देसम पार्टीत दाखल झाले. टीडीपीमधून त्यांनी दोन वेळा विधानसभा लढवली त्यात ते विजयी देखील झाले. यानंतर पक्षातील अंतर्गत वादामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि ते २०१७ साली काँग्रेसमध्ये गेले. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणुक लढवली आणि आपल्या क्रेज आणि ग्राउंडवरील कामामुळे ती जिकली देखील.