"अपात्रतेबाबत आधीच मॅच फिक्सिंग" ; संजय राऊतांच्या आरोपावर नार्वेकर म्हणाले....

निकालाचं मॅचफिक्सिंग आधीच झालं आहे. विधानसभा अध्यक्ष आज फक्त औपचारिकता म्हणून निकाल देणार आहेत.
"अपात्रतेबाबत आधीच मॅच फिक्सिंग" ; संजय राऊतांच्या आरोपावर नार्वेकर म्हणाले....

"जेव्हापासून क्रिकेटमध्ये गॅम्बलिंग किंवा जुगार सुरू झालाय तेव्हापासून मॅच फिक्सिंग हा शब्द वारंवार आपल्या कानावर पडतो. तशीच मॅच फिक्सिंग आज महाराष्ट्रात ४ वाजता होणार आहे", असा गंभीर आरोप शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आज आमदार अपात्रतेच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर केला. निकालाचं मॅचफिक्सिंग आधीच झालं आहे. विधानसभा अध्यक्ष आज फक्त औपचारिकता म्हणून निकाल देणार आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही या मॅच फिक्सिंगची माहीत आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे.

ही तर मॅच फिक्सिंग -

आज सकाळी माध्यमांशी बोलताना, "सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अपात्रतेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार दिलाय. राज्याचे मुख्यमंत्री बेकायदेशीररित्या सत्तेत बसले आहेत. आमच्यासाठी ते एक गुन्हेगार आणि आरोपी आहेत. पण, ज्यांना (नार्वेकर) निर्णय घ्यायचा आहे तेच जर आरोपीच्या (मुख्यमंत्र्यांच्या) घरी वारंवार जाऊन दोन-दोन तास भेटत असतील, तर त्यावरून काय समजायचे. तुम्ही काय आरोपीला तुमचा निर्णय दाखवण्यासाठी गेले होते. ही बाब आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या रेकॉर्डवर आणणार आहोत. ही मॅच फिक्सिंग आहे", असे राऊत म्हणाले.

निकाल दिल्लीवरून आलाय -

आज निर्णय येणार आहे आणि १२ तारखेला पंतप्रधान मोदी महाराष्ट्रातील नाशिक वगैरे येथे रोड शो घेणार आहेत. मुख्यमंत्रीही दावोसला जात आहेत. कारण त्यांना निर्णय माहिती आहे, मॅच फिक्सिंगबाबत माहिती आहे. म्हणून हा आत्मविश्वास आहे. ही सर्व मॅच फिक्सिंग आहे", असा दावा राऊत यांनी केला आहे.

राऊतांच्या बोलण्याला काही अर्थ नसतो - नार्वेकर

राऊत यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारले असता, "संजय राऊत काहीही टीका करू शकतात. ते उद्या म्हणतील की, हा निकाल लंडन, अमेरिकेवरून आणला आहे. त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नसतो. राऊत यांच्या टीकेला उत्तर देऊन आम्हाला त्यांना स्वस्तातली प्रसिद्धी द्यायची नाही. संजय राऊत यांचा अनुल्लेख केलेला बरा", असे नार्वेकर म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in