"मी बोलावं एवढी आदित्य ठाकरेंची उंची नाही", रामदास कदमांच्या विधानावर संजय राऊत यांचं उत्तर

रामदास कदम यांनी ठाकरे पिता पुत्रांचा एकेरी उल्लेख करत टीका केली आहे.
"मी बोलावं एवढी आदित्य ठाकरेंची उंची नाही",  रामदास कदमांच्या विधानावर संजय राऊत यांचं उत्तर
Published on

शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर दोन गट निर्माण झाले. या दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर नेहमी टीका केली जाते. हे दोन्ही गट टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दरम्यान, शिंदे गटात असलेले आमदार रामदास कदम यांनी ठाकरे पिता पुत्रांचा एकेरी उल्लेख करत टीका केली आहे. आदित्य ठाकरेंवर मी बोलणं योग्य होणार नाही. मी उद्धव ठाकरेंवर बोलेन. मी बोलावं इतकी आदित्य ठाकरेंची उंची नाही. आदित्य साहेब आणि त्यांचा बाप आमदार, खासदार मंत्री, सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भेटही घेत नव्हेत. परंतु, आता एकनाथ शिंदेंनी त्यांना असं कामाला लावलंय की बापही पळतोय आणि बेटाही पळतो, अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे.

रामदास कदम यांनी केलेल्या टीकेला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना राऊत म्हणाले की, रामदास कदमांसह शिवसेना सोडून गेलेले आमदार निवडणुकीला उभे राहतील तेव्हा कोणाची किती उंची आहे ते कळेल. तुम्ही निवडणूक घ्या. जे विधानसभा सदस्य पळून गेले आहेत त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला उभं राहावं. तेव्हा कळेल कोण किती उंचीचं आहे.

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, रामदास कदम हे आमचे एकेकाळचे सहकारी आहेत. ते ज्या भाषेत बोलत आहेत. त्या भाषेत मी बोलणार नाही. त्यांचे आणि आमचे अनेक वर्षांचे संबंध आहेत. ते आमचे जुने सहकारी आहेत. सहकारी म्हणून, मित्र म्हणून आम्ही एकत्र अनेक वर्ष काम केलं आहे. त्यांनी त्यांचा एक वेगळा मार्ग स्वीकारला आहे. ते चुकीच्या मार्गाने गेले आहेत. त्यांची कारणं त्यांच्यापाशी, पण शिवसैनिक आणि जनता ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या पाठीशी आहे. येत्या निवडणुकीत कोकणात हे चित्र दिसेल. असं उत्तर खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in