भाजप विरोधकांचा दुसरा मेळावा आता जुलै १७-१८ दरम्यान

ट्विट करून नव्या वेळापत्रकाची घोषणा
भाजप विरोधकांचा दुसरा मेळावा आता जुलै १७-१८ दरम्यान

नवी दिल्ली : भाजपविरोधी पक्षांचा पूर्वनियोजित मेळावा आता पुढे ढकलण्यात आला आहे. ताज्या माहितीनुसार, हा मेळावा आता बंगळुरू शहरात १७ ते १८ जुलैदरम्यान भरविण्यात येणार आहे. कर्नाटक आणि बिहार राज्यांमध्ये विधानसभांची पावसाळी अधिवेशने असल्यामुळे तसेच राष्ट्रवादी पक्षामध्ये सध्या राजकीय अस्तित्वाची लढार्इ सु‌रू असल्यामुळे देखील हा नियोजित मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे. राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर भाजपविरोधी आघाडीतील एकतेबाबत शंका उत्पन्न झाली आहे.
पूर्वनियोजनानुसार विरोधकांचा मेळावा शिमला शहरात १२ जुलैच्या आसपास भरवण्यात येणार होता, मात्र तेथील प्रतिकूल हवामानामुळे नेत्यांनी मेळाव्याची जागा बदलून बंगळुरू करण्यात आली आहे. जुलै १३-१४ दरम्यान बंगळुरू शहरात हा मेळावा घेण्यात येणार होता. नवी तारीख आणि स्थान राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांनी जाहीर केले होते, मात्र काही विरोधी नेत्यांना यामध्ये बदल करावा असे वाटत आहे.
सोमवारी काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाळ यांनी ट्विट करून नव्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. पाटणातील प्रचंड यशस्वी बैठकीनंतर आपण दुसरी बैठक १७ व १८ जुलै रोजी बंगळुरू येथे भरवत आहोत. आम्ही उजव्या लोकशाहीविरोधी शक्तींना हरवण्याच्या आमच्या उद्दिष्टासाठी कटिबद्ध असून, देश पुढे नेण्यासाठी आमचा दृष्टिकोन अबाधित आहे असे ट्विट वेणुगोपाळ यांनी केले आहे. दुसरी बैठक किंचित लांबल्यामुळे विरोधी नेतृत्वाला आपसारख्या पक्षाला आपली भूमिका नरम करण्यासाठी थोडी उसंत मिळणार आहे. काँग्रेसने दिल्ली अध्यादेशाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी आप पक्षाची मागणी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट न पाहता काँग्रेसने आपली भूमिका जाहीर करावी, असे आपचे म्हणणे आहे. तसेच विरोधी नेते डीएमकेच्या सहभागाबाबतही थोडे साशंक होते. कारण कर्नाटक आणि तामिळनाडू यांच्यात मेकेदातु वाद आहे, पण तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन बैठकीस उपस्थित राहणार आहेत, असे डीएमकेच्या सूत्रांकडून कळवण्यात आल्याने ती शंका दूर झाली आहे. स्टॅलिन विरोधी पक्षांच्या एकजुटीचे महत्त्व जाणून आहेत. त्यामुळे ते बैठकीस उपस्थित राहणार असल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in