महिला सुरक्षेवरून शरद पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल, राज्यातील ४४३४ मुली बेपत्ता असल्याचा केला दावा

शरद पवार यांनी समान नागरी कायद्यावर देखील मांडलं मत
महिला सुरक्षेवरून शरद पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल, राज्यातील ४४३४ मुली बेपत्ता असल्याचा केला दावा

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यातील महिलांच्या सुरक्षेवरुन राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. गेल्या सहा महिन्याच्या काळात १४ जिल्ह्यातून ४४३४ मुली बेपत्ता असल्याची माहिती शरद पवारांनी दिली आहे. यावेळी बोलताना पवार यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलच धारेवर धरलं. राज्य सरकारला एक वर्ष पूर्ण झालं असून अनेक प्रश्न समोर आहेत. त्यापैकी कायदा आणि सूव्यवस्था हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. महिला आणि मुलींवर हल्ले होत असून त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना त्यांनी ठाणे, पुणे, आणि मुंबई महापालिकेतील माहिती माझ्याकडे असल्याचं सांगितलं. जानेवारी २०२३ पासून ठाण्यातून ७२३ मुली, मुंबईतून ७२३ मुली आणि सोलारपूरमधून ६७ अशा एकूण जवळपास २४५८ मुली बेपत्ता असल्याचं ते म्हणाले.

शरद पवार यांनी समान नागरी कायद्यावर देखील आपलं मत मांडलं. यावेळी त्यांनी केंद्र सरकारला काही प्रश्न देखील विचारले. एकाच देशात दोन कायदे नको असं पंतप्रधानांनी म्हटल्याची माहिती आहे. त्यावर समान नागरी कायदा लागू करण्याचा विचार सुरु असल्याचं ते म्हणाले. यावर शिख समाज, जैन समाज आणि इतर समाजाची भूमिका काय आहे हे स्पष्ट व्हावं, असं त्यांनी सांगितलं. शिख समाजाचं वेगळ मत असल्याचं माझ्या कानावर आलं आहे. समान नागरी कायद्याला विरोध करण्याची भूमिका त्यांनी घेतली असल्याचं देखील पवार यावेळी म्हणाले. कायदा आयोगानं सांगितल्याप्रमाणे सर्वांचं मत विचारात घेऊन यावर निर्णय घ्यावा, असं मत यावेळी शरद पवार यांनी मांडलं.

तसंच समान नागरी कायदा लागू करण्याची बातमी सगळीकडे पसवली जात आहे. हे कुठल्यातरी महत्वाच्या प्रश्नावरुन लक्ष विचलीत करण्यासाठी केलं जात आहे का हे पाहावं लागेल, असं देखील पवार म्हणाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in