विशेष प्रतिनिधी/मुंबई
२००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नवखे असल्याने आपण मुख्यमंत्रीपद घेतले नव्हते, असे वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नुकतेच केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, त्यावेळी पक्षात एकापेक्षा एक अनुभवी नेते होते, कुणीही नवखे नव्हते. परंतु, शरद पवार हे धादांत खोटे बोलत आहेत, असा हल्लाबोल केला.
मुंबईत राष्ट्रवादी अजित पवार गटाची बैठक सोमवारी पार पडली, त्यावेळी अजित पवार बोलत होते. २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळाले होते. त्यावेळी आघाडीत राष्ट्रवादीच मोठा पक्ष असल्याने मुख्यमंत्रीपद चालून आले होते. परंतु, त्यावेळी शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपद नाकारले होते. त्यावरून टीका होत असताना शरद पवार यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनुभवी नेते नव्हते, असा दावा केला होता. त्यावरून आता अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. शरद पवार यांचे हे विधान फेटाळून लावत शरद पवार हे धादांत खोटे बोलत आहेत, असा आरोप केला.
त्यावेळी मला वाटले की, छगन भुजबळ मुख्यमंत्री होतील. मी मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक नव्हतो. खरे तर त्यावेळी संधी असताना आता जे आपले वरिष्ठ सांगत आहेत की, काही जण नवखे होते, ते सर्व चुकीचे आहे. १९९१ मध्ये शरद पवार संरक्षण मंत्री होते. त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नाव पुढे आले होते. परंतु, ऐनवेळी सुधाकरराव नाईक यांचे नाव पुढे आले. नाईक यांनीही एक वर्ष शरद पवार यांचे फारसे ऐकले नाही. २००४ मध्येही आपले कुणी ऐकणार नाही, असे कदाचित शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना वाटले असावे, असे अजित पवार म्हणाले.
राज्यसभेच्या जागेवरून बोलताना अजित पवार यांनी साताऱ्याची राज्यसभेची जागा ही साताऱ्यालाच मिळेल, असे सांगून त्यांनी या जागेचा संभ्रम दूर केला. या अगोदर सातारच्या लोकसभेच्या प्रचारादरम्यान वाईचे राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांना खासदार केले नाही, तर पवारांची अवलाद नाही, असा शब्दप्रयोग अजित पवार यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर बोलताना अजित पवार यांनी प्रत्येकालाच मानसन्मान हवा असतो. लोक देतील तो कौल मान्य करून आपल्याला पुढे जायचे असते. आपण साताऱ्याची जागा दिली. परंतु, त्या बदल्यात मिळणारी जागा साताऱ्यालाच देण्यात येणार आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा सोडणार नाही
काहीही झाले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुले, शाहू, आंबेडकर यांची विचारधारा सोडणार नाही. याअगोदर प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांनीही याचा उल्लेख केलेला आहे. मी स्वत:, केंद्रीय मंत्री अमित शहा, जे. पी. नड्डा यांनीही त्याबाबत आधीच सांगितलेले आहे. आम्ही केवळ विकासाच्या मुद्यावर आपल्यासोबत आलो आहोत, असेही मी याअगोदरच स्पष्ट केले आहे, असेही अजितदादा म्हणाले.