शरद पवारांचा राजीनामा हे नाटकच!

अजित पवारांचा गौप्यस्फोट : भाजपसोबत जायला त्यांनीच सांगितले
शरद पवारांचा राजीनामा हे नाटकच!

मुंबई : शरद पवार मला एक सांगत होते आणि वेगळेच करत होते. त्यांनी मला भाजपसोबत सत्तेत सहभागी व्हा, मी राजीनामा देतो, असे सांगितले. १ मे रोजीच राजीनामा द्यायचे ठरले होते. नंतर त्यांनी राजीनामाही दिला. ते राजीनामा देत असल्याची माहिती फक्त घरातील तिघांनाच होती. त्यामुळे तिथे वेगळेच वातावरण तयार झाले. राजीनामा मागे घेण्यासाठी तेथे आग्रह धरला गेला. परंतु, प्रत्यक्षात वेगळेच चित्र होते. राजीनामा मागे घ्यायला लावण्यासाठी दुसऱ्या दिवशी शरद पवारांनीच वाय. बी. सेंटरवर आंदोलन करायला सांगितले आणि आंदोलनानंतर त्यांनी लगेच राजीनामा मागे घेतला. त्यांची सतत धरसोडवृत्ती सुरू होती. तुम्हाला राजीनामा मागे घ्यायचा होता, तर मग नाटक कशाला केले, असा सवाल करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी शरद पवारांबद्दल बरेच गौप्यस्फोट केले. याला खा. सुप्रिया सुळे यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले.

रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे दोन दिवसीय शिबीर पार पडले. या शिबिरात शुक्रवारी अजित पवार यांनी शरद पवारांवर वेगवेगळे आरोप करत जोरदार हल्लाबोल केला. भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याबाबत निर्णय घेण्याकरिता आम्ही सुप्रियाला देवगिरीवर बोलावून शरद पवार यांना निरोप द्यायला सांगितला. त्यावेळी राष्ट्रवादीचे जवळपास सर्वच नेते उपस्थित होते. लोकशाहीत बहुमताचा आदर करावा लागतो, तरच संघटना पुढे जाते, असेही सांगण्यात आले. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी १० दिवसांचा वेळ मागितला. पण, १० दिवस उलटून गेले तरी कुठलाही निर्णय झाला नाही. त्यानंतर आम्ही घरातील मंडळी थेट शरद पवार यांच्याकडे गेलो. त्यांनी सर्व काही ऐकले आणि काय करायचे ते बघू, असे उत्तर दिले. त्यानंतर वाय. बी. चव्हाण सेंटरवर बसलो. तिथे काय तो लवकर निर्णय घ्या, असे सांगितल्याचे अजित पवार म्हणाले.

दरम्यान, पुस्तक प्रकाशन समारंभाच्या एक दिवस आधीच शरद पवार यांनी राजीनामा देण्यासंदर्भात सांगितले होते. १ मे रोजी त्यांनी मला बोलावून सरकारमध्ये जा, मी राजीनामा देतो, असे म्हटले होते. हे फक्त घरातल्या चौघांनाच माहीत होते. त्यानंतर ठरल्याप्रमाणे पुस्तक प्रकाशनाच्या वेळीच त्यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि तिथेच १५ लोकांची कमिटी जाहीर केली. या कमिटीने अध्यक्ष निवडावा, असे सांगून टाकले. अचानक घोषणा केल्याने सगळ्यांना धक्का बसला. या निर्णयाला अनेकांनी विरोध केला. परंतु, मला याची कल्पना असल्याने मी माझी भूमिका मांडली. एकदा राजीनामा दिला. मग पुन्हा राजीनामा परत घेण्याची गरज काय होती, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.

एकीकडे पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि दुसरीकडे आनंद परांजपे आणि जितेंद्र आव्हाड यांना बोलावून घेतले व उद्यापासून चव्हाण प्रतिष्ठानला महिला आणि युवकांना बोलवा आणि तिथे आंदोलन करून राजीनामा परत घेण्याची मागणी करायला लावा, असे सांगितले. आनंद परांजपे इथेच आहेत, त्यांना विचारा. रोज ठरावीक लोक तिथे जाऊन बसायला लागले. जितेंद्र आव्हाड सोडला तर तिथे कुणीही आमदार नव्हते. शरद पवार मला एक सांगत आहेत आणि दुसऱ्यांना एक सांगत आहेत, असेच चालले होते. जर तुम्हाला राजीनामा द्यायचा नव्हता, तर मग दिलाच कशाला, असा सवाल करीत नंतर त्यांनी राजीनामा घेतला. आम्हाला सांगितले, माझ्यानंतर सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा. सगळ्या गोष्टी ठरल्या होत्या. सगळ्यांनी तयारीही दर्शविली. मग आडले कुठे, असे अजित पवार म्हणाले. यांची सतत धरसोडवृत्ती, आम्हाला सातत्याने गाफिल ठेवले. परंतु असे गाफिल ठेवणे बरोबर नाही. मला ते पटत नाही. म्हणून एक घाव, दोन तुकडे केले. आता विषय संपला, असेही अजित पवार म्हणाले.

मंत्रिपद न मिळाल्याने देशमुख आले नाहीत

शरद पवार यांना राजकारणातून घरी बसवण्यासाठी अजित पवार यांना भाजपने सुपारी दिली आहे. त्यापद्धतीने अजित पवार काम करत आहेत, असे विधान माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘‘मंत्रिपद न मिळाल्याने देशमुख आमच्याबरोबर आले नाहीत. अनिल देशमुख माझ्याबरोबर सर्व बैठकांना उपस्थित होते. ‘मला मंत्रिमंडळात स्थान मिळालं पाहिजे’ असं देशमुखांनी म्हटलं होतं. पण, भाजपने त्याला विरोध केला. त्यामुळे मंत्रिपदाच्या यादीतून देशमुखांचे नाव वगळले. म्हणून देशमुखांनी आमच्यासोबत येण्यास नकार दिला, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला.

१७ जुलैला शरद पवारांनीच बोलावले

आम्ही २ जुलै रोजी महायुती सरकारमध्ये सामिल झालो. हा निर्णय शरद पवार यांना पटला नाही तर मग १७ जुलैला आम्हाला बोलावले कशाला, असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला. पहिल्यांदा मंत्र्यांना घेऊन यायला सांगितले आणि त्यानंतर आमदारांना बोलावले. यातून काहीतरी बदल होईल, असे आम्हाला वाटले. परंतु त्यावेळीही आम्हाला गाफिल ठेवले, असा आरोपही अजित पवार यांनी केला.

उद्योजकाच्या घरीही पवारांनीच बोलावले

१२ ऑगस्ट रोजी शरद पवारांसोबत उद्योजकाच्या घरी भेटल्याबाबतचा खुलासा करताना त्यादिवशीदेखील शरद पवार यांनीच मला बोलावले होते. त्यांनी बोलावले म्हणून मी गेलो. तिथे जयंत पाटीलही उपस्थित होते. तुम्हाला काय करायचेच नव्हते, तर मग कशासाठी ही उठाठेव करता, असा सवाल करीत शरद पवारांवर जोरदार हल्ला चढविला.

मूळ राष्ट्रवादी पक्ष आपलाच

आपलाच राष्ट्रवादी हा मूळ राष्ट्रवादी पक्ष आहे. त्यामुळे आपल्याला कामाला लागायचे आहे. सर्वांच्या आशीर्वादाने पुढे जाऊ यात. असे सांगत आगामी निवडणुकीत सर्वांनाच न्याय मिळेल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

लोकसभेच्या चार जागा अजित पवार गट लढणार

बारामतीसह शिरूर, सातारा, रायगड या चारही जागा अजित पवार गट लढणार असल्याची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. कर्जत येथील वैचारिक मंथन शिबिरात ही घोषणा करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन गटांतच हा सामना रंगणार असल्याचे चित्र आहे. यातून राष्ट्रवादीत संघर्ष उफाळण्याचीही चिन्हे आहेत.

कोण कुठून लढणार हा महायुतीचा प्रश्न

अजित पवार यांनी बारामतीसह राष्ट्रवादीच्या चारही जागांवर उमेदवार देणार असल्याचे जाहीर करताच खा. सुप्रिया सुळे यांनी मी लोकशाहीवर विश्वास ठेवणारी व्यक्ती आहे. कोणत्याही पक्षाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. कोण कुठून लढायचे, हे ठरविण्याचा अधिकार महायुतीचा आहे. आमची नाती एका जागेवर आहेत आणि राजकारण वेगळे आहे. लोकशाहीत कुणीतरी माझ्याविरोधात लढलेच पाहिजे. त्यामुळे निवडणुकीत माय-बाप जनताच काय ते ठरवेल, अशा शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

logo
marathi.freepressjournal.in