काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण(Ashok Chavan) यांनी राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमावर टीका केली आहे. शासन आपल्या दारी म्हणजे एकदिवसीय इव्हेंट असल्याचं ते म्हणाले आहेत. आज (१७ ऑगस्ट) गुरुवारी सांगलीतील विष्णू अण्णा खरेदी-विक्री संघाच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगली लोकसभा काँग्रेस पक्षच लढवणार असून जिंकणार असल्याचं सांगितलं. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही पूर्वतयारी सुरु केली आहे, असं देखील चव्हाण म्हणाले.
राज्याची परिस्थिती बिकट असून केवळ लोकानुयी घोषणा केल्या जात आहेत. पण अंमलबजावणी मात्र होत नाही. सरकारवर लोकांचा विश्वास राहीला नाही. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम म्हणजे एक दिवसाचा इव्हेंट आहे. राज्यात जातीय तणाव निर्माण करुन त्याचा फायदा उठवला जात आहे. आगामी निवडणुकीत फायदा करण्यासाठी दंगल सदृष्यस्थिती निर्माण केली जात आहे, अशी देखील टीका अशोक चव्हाण यांनी केली.
फोडोफोडीच्या राजकारणावर केली टीका
यावेळी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी फोडाफोडीच्या राजकारणावर टीका केली आहे. घाउकमध्ये पक्ष फोडण्याचं काम सध्या सुरु असून बहुमत असताना फोडाफोडी करायची काय गरज? इतर पक्षातील लोक घेतल्याशिवाय लोकसभेला मतदान मिळणार नाही याची भीती वाटत असल्यानेच घाऊक पक्ष फोडाफोडी करण्याच काम सुरु असल्याचं चव्हाण म्हणाले. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांची कुचंबणा सुरु झाली आहे. आपण भाजपसोबत गेलो? असा प्रश्न त्यांना सतावत असल्याचंही ते म्हणाले.