मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपामध्ये वरचष्मा ठेवण्यात यशस्वी झालेल्या भाजपला विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपात मात्र चांगलेच कोंडीत पकडण्याची व्यूहरचना शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाने आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना (शिंदे) गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी विधानसभेच्या निवडणुकीत शिंदे गटाला १०० जागा मिळाव्यात, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे महायुतीमधील घटक पक्ष आहेत. विधानसभेची आगामी निवडणूक येत्या ऑक्टोबर महिन्यात होणार आहे.
शिंदे गटाला किमान १०० जागा मिळावयास हव्यात आणि त्यापैकी ९० जागा आम्ही जिंकू, असे रामदास कदम म्हणाले. तर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपल्या पक्षाला ८०-९० जागा मिळाव्यात, अशी इच्छा व्यक्त केली आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्याने विधानसभेत आम्हीच जास्त जागा लढविणार, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.